मंत्री गडाख म्हणाले, माझे कुटुंब माझी जबाबदारी यशस्वी करणार

सुनील गर्जे
Saturday, 19 September 2020

वडाळे बहिरोबा (ता. नेवासे ) येथे 'माझे कुटुंब-माझी जबाबदारी' या मोहीमेचा प्रारंभ मंत्री गडाख यांच्या प्रमुख उपस्थितीत रुग्णाची तपासणी करून झाला.

नेवासे  :  कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी आणि मृत्यूदर कमी करण्याकरिता राबविण्यात येणार्‍या 'माझे कुटुंब-माझी जबाबादारी' ही मोहीम लोकसहभागातून यशस्वी करणार असून कोरोनामुक्तीसाठी नागरिकांनी या मोहिमेस सहकार्य करावे. असे आवाहन राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव पाटील  गडाख यांनी केले. 

वडाळे बहिरोबा (ता. नेवासे ) येथे 'माझे कुटुंब-माझी जबाबदारी' या मोहीमेचा प्रारंभ मंत्री गडाख यांच्या प्रमुख उपस्थितीत रुग्णाची तपासणी करून झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते. मुळा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भाऊसाहेब मोटे, तहसीलदार रुपेश सुराणा, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिराज सुर्यवंशी, गटविकास अधिकारी शेखर शेलार यावेळी उपस्थित होते.

मंत्री गडाख म्हणाले, "कोरोनबाबत नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती व्हावी, कोविड नियंत्रणासाठी नवीन जीवनशैली पद्धतीचा अवलंब करण्यास अधिकाधिक व्यक्तींना प्रेरित करणे, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार संपूर्ण राज्यभरात ही मोहीम राबविली जात आहे. मोहिमेमुळे कोरोना विषाणूची साखळी तोडून कोरोना आटोक्यात आणण्यास मदत होईल. 

यावेळी मंत्री गडाख यांनी जिल्ह्यात व नेवासे तालुक्यात कोरोना बाधीत रुग्णांना वेळेवर सर्व आरोग्य सुविधा मिळाल्या पाहिजेत. रुग्णांना ऑक्सीजनची व्यवस्था व बेडची सुविधा तात्काळ उपलब्ध करुन दिली पाहिजे. आवश्यक ठिकाणी ऑक्सीजन बेड, ऑक्सीजन पुरवठा, व्हेन्टीलेटर या सुविधा वाढविण्याच्या सूचना आरोगी विभागाला दिल्या. यावेळी सरपंच, आरोग्य, ग्रामविकास, महसूल विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

प्रशांत गडाखांच्या भेटीनंतर 'आरोग्य विभाग' अलर्ट
युवानेते प्रशांत पाटील गडाख यांनी नुकतीच शनिशिंगणापुर कोविड केअर सेंटरला भेट देवून केलेली पहाणी, रुग्णांशी साधलेला थेट संवाद, सोयसुविधांचा घेतलेला आढावा व आरोग्य विभागाला दिलेल्या इशारावजा सूचनांमुळे जिल्हा 'आरोग्य विभाग' अलर्ट झाला आहे. त्यांची लगेच तब्येत सुधारली. जिल्ह्यातील प्रत्येक कोविड सेंटरला संबंधित आरोग्य अधिकारी लक्ष ठेवून आहे. तसेच जिल्हा आरोग्य विभागाकडून दररोज आढावा घेण्यात येत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिली.  दरम्यान प्रशांत पाटील गडाखांनी रुग्णांना दिलेला मानसिक आधारामुळे रुग्ण, त्यांचे नातेवाईकांसह सर्वसामान्य  नागरिकांकडून समाधान  व्यक्त होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Minister Gadakh said, “My family will fulfill my responsibility