मंत्री तनपुरे म्हणाले, मला उद्या हा इंजीनियर सस्पेंड झालेला पाहिजे

विलास कुलकर्णी
Tuesday, 1 December 2020

डोंगरगण ते बांबोरी रस्त्यावर नगर विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचा ताफा अचानक थांबला.

राहुरी (अहमदनगर) : डोंगरगण ते बांबोरी रस्त्यावर नगर विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचा ताफा अचानक थांबला. रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाची त्यांनी पाहणी केली. निविदेत नमूद केल्याप्रमाणे काम होत नसल्याचे लक्षात आले.

तसा रागाचा पारा चढला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांना तत्काळ संपर्क साधून, या रस्त्यावरील खड्डे बुजणाऱ्या इंजिनीयरला सस्फेंड करा, असे निर्देश मंत्री तनपुरे यांनी दिले.

राज्यमंत्री तनपुरे डोंगरगण- वांबोरी रस्त्यावरून विवाह सोहळ्यासाठी जात होते.  जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे, वांबोरीचे माजी सरपंच नितीन बाफना किसन जवरे बरोबर होते. रस्त्यातील खड्डे बुजवण्याचे काम सुरू होते. निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याचे त्यांच्या निदर्शनाला आले. त्यांनी तात्काळ ताफा थांबवण्यास सांगितले. कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. तेव्हा, त्यांचा संताप अनावर झाला.

कामावर उपस्थित सुपरवायझरला बोलावून त्यांनी "माझ्या मतदारसंघात रस्त्याच्या कामाच्या बाबतीत कोणताही बेजबाबदारपणा खपवून घेतला जाणार नाही. सर्वसामान्य जनतेच्या कर रुपी पैशाचा विनियोग अत्यंत योग्य पद्धतीनेच झाला पाहिजे. यावर माझे बारीक लक्ष असणार आहे." असा दम भरला. तत्काळ अधीक्षक अभियंत्यांना संपर्क साधून, संबंधित अभियंत्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले.  त्यामुळे, उपस्थितांचे धाबे दणाणले.

सध्या करोनामुळे रस्त्याच्या कामांसाठी निधी मिळणे मोठे अवघड झाले आहे. अशात जी कामे चालू आहेत. ती योग्य पद्धतीने आणि दर्जेदार होणे अपेक्षित आहे. परंतु, दुर्दैवाने तसे होताना बऱ्याच ठिकाणी दिसत नाही. असे प्रकार खपवून घेतले जाणार नाही. 
- प्राजक्त तनपुरे, नगरविकास राज्यमंत्री 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Minister Prajakt Tanpure inspected the road