मंत्री तनपुरे संतापले : बिबट्या पकडा किंवा ठार करा; पण आता बळी नको

राजेंद्र सावंत
Saturday, 31 October 2020

बिबट्याच्या हल्ल्यात तीन बालकांचा बळी गेला. आता चौथा बळी जाणार नाही, याची काळजी वन अधिकाऱ्यांनी घ्यावी.

पाथर्डी (अहमदनगर) : तालुक्‍यात बिबट्याच्या हल्ल्यात तीन बालकांचा बळी गेला. आता चौथा बळी जाणार नाही, याची काळजी वन अधिकाऱ्यांनी घ्यावी. बिबटे पकडा किंवा नरभक्षक जाहीर करून परवानगी घेऊन ठार करा; मात्र आता कोणाचाही बळी जाता कामा नये. औरंगाबाद व अन्य जिल्ह्यांतील तज्ज्ञांची पथके बोलवा. वन विभागाचे जे अधिकारी नागरिकांना सहकार्य करणार नाहीत, त्यांची चौकशी करून कारवाई करू, असा इशारा नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिला. 

शिरापूर येथील पानतसवाडी येथील सार्थक संजय बुधवंत याला गुरुवारी बिबट्याने उचलून नेले होते. सकाळी सातच्या सुमारास सार्थकचा मृतदेह शेतात सापडला. त्यामुळे शिरापूरचे ग्रामस्थ संतप्त झाले होते. वन अधिकाऱ्यांना वारंवार सांगूनही बिबट्या पकडण्यासाठी प्रयत्न झाले नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. मढीची श्रेया साळवे, केळवंडीचा सक्षम आठरे व शिरापूरचा सार्थक बुधवंत यांचा बिबट्याने बळी घेतला. सार्थकचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नेण्यास ग्रामस्थांनी विरोध केला. वन विभागाचे अधिकारी व पोलिसांबाबत नागरिकांनी संताप व्यक्त केला. 

मंत्री तनपुरे यांनी नागरिकांची समजूत काढली. नरभक्षक बिबट्यांना पकडा अथवा ठार करण्याच्या सूचना वन विभागाच्या मुंबई येथील अधिकाऱ्यांशी संवाद साधून दिल्या. वन विभागाचे अधिकारी सहकार्य करीत नसल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी केल्या असता, याबाबत चौकशी करून दोषींवर कारवाई करू, असे ते म्हणाले. पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात सार्थकच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी झाल्यावर सायंकाळी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Minister Prajakt Tanpure visited the family in Pathardi taluka