केंद्रीय मंत्री पत्रव्यवहार दाखवत म्हणाले, मुख्यमंत्री ठाकरे सरकार आम्हाला हवा तसा प्रतिसाद देईना

सनी सोनावळे
Wednesday, 12 August 2020

के. के. रेंज संदर्भात आम्ही सातत्याने राज्य सरकारकडे पत्रव्यवहार करत आहोत. त्यांच्याकडून हवा तसा सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही.

टाकळी ढोकेश्वर (अहमदनगर) : के. के. रेंज संदर्भात आम्ही सातत्याने राज्य सरकारकडे पत्रव्यवहार करत आहोत. त्यांच्याकडून हवा तसा सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही, मात्र यासंदर्भात आपण लष्कर प्रमुख व या विषयातील सर्व तालुक्यातील संबंधित प्रमुखांची बैठक लावु व मार्ग काढु, असे आश्वासन केंद्रीय सरंक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी नगर जिल्ह्य़ातील शिष्टमंडळास दिले आहे.

पारनेर व राहुरी तालुक्यातील गावांमध्ये चार दिवसांपासून सैन्य दलातील अधिकारी वाहनांसह मोजमाप करताना दिसत आहेत. याबाबत बुधवारी (ता. १२) नवी दिल्ली येथे खासदार सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली माजी आमदार शिवाजी कर्डिले, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील, दुध संघाचे अध्यक्ष राहुल शिंदे या शिष्टमंडळाने सिंग यांची भेट घेऊन या विषयात आपण सकारात्मक भुमिका घ्यावी, अशी मागणी केली.

सुजित झावरे पाटील व शिवाजी कर्डिले यांनी याबाबत योग्य त्या कागदपत्रासहींत ठाम भुमिका मांडत या गावांमध्ये भितीचे वातावरण आहे. कुठल्याच प्रकाराची सुचना दिली नसल्याने नेमके काय सुरू आहे. या संभ्रमात नागरीक आहेत. आपण हे थांबवावे येथील जमिन घेण्यात येऊ नये, आमच्या शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने ही जमीन तयार केली आहे, अशी विनंती त्यांनी या बैठकीत केली.

यावेळी सिंग यांनीही या शिष्टमंडळास तब्बल ३५ मिनीटे वेळ देत या संदर्भातील फाईल बोलावुन घेऊन राज्य सरकारला केलेला पत्रव्यवहार दाखवत आम्हाला हवा तसा प्रतिसाद दिला नसल्याचे सांगितले. तरीही याबाबतीत आपण लष्करप्रमुखांची लवकरच बैठक लावुन यातील शंका दुर करू या बैठकीस तालुक्यातील सर्व राजकीय लोकांनाही बोलाविले जाईल. यातुन आपण एक सकारात्मक निर्णय घेऊ असल्याचे सांगितले.

काय आहे के. के. रेंज
के. के. रेंज क्षेत्र आर- 2 सुरक्षा क्षेत्रामध्ये पारनेर तालुक्यातील 5, राहुरीतील 12 गावांचा तर नगर तालुक्यातील 6 गावांचा सहभाग आहे. पारनेर तालुक्यातील वनकुटे, पळशी, वडगाव सावताळ, गजदीपूर, ढवळपूरी नगर तालुक्यातील इस्लामपूर, सुजानपूर, नांदगाव, शिंगवे, घानेगाव, देहरे राहुरी येथील मुळा धरणाच्या लगत असलेले बारागाव नांदूर, बाभूळगाव, ताहाराबाद, घोरपडवाडी, जांभूळबन, गाडकवाडी, कुरणवाडी, दरडगावथडी, वरवंडी, जांभळी, वावरथ, चिंचाळे, गडधे आखाडा व चिंचाळे या गावांचा समावेश आहे. अशा एकूण 23 गावांवर के.के.रेंज क्षेत्राची टांगती तलवार उभी आहे.

अधिग्रहण होणार की नाही याबाबत ग्रामस्थांना ठोस उत्तर मिळत नाही आहे. राजकीय नेते अधिग्रहण होणार नसल्याचे सांगत आहे. परंतु काही दिवसांपूर्वीच सैन्य दलाने 23 गावातील मालमत्तेची मुल्यांकण घेतले. त्यानंतर संबंधित क्षेत्रामध्ये असलेले उच्च प्रतिच्या मालमत्तेचा तपशिल महसूल विभागाकडून घेतला. यानंतर सैन्य दलाचे वाहने संबंधित गावामध्ये पाहणी करीत असल्याचे दिसून आले या पार्श्वभूमीवर आजची भेट ही महत्त्वपूर्ण मानली जाते.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Minister Rajnath Singh was meet by MP Sujay Vikhe