
राज्यमंत्री तनपुरे यांनी नदीपात्रात प्रत्यक्ष पाहणी करून, रस्त्याच्या कामासाठी पोकलेन मशीन व सिमेंटच्या नळ्या उपलब्ध करून दिल्या.
राहुरी : राहुरी ते देसवंडी दरम्यान मुळा नदीपात्रातील रस्ता राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी स्वखर्चातून तयार करून दिला. आज (सोमवारी) देसवंडी व तमनर आखाडाच्या ग्रामस्थांना रस्ता सुरू झाल्याने, गैरसोय दूर झाली.
वाळूतस्करांनी मुळा नदी पात्रातील शासकीय मालकीची वाळू चोरून, मोठे खड्डे तयार केले होते. त्यामुळे, नदीपात्रातील रस्ता बंद झाला होता. देसवंडी व तमनर आखाडा येथील ग्रामस्थांना राहुरीला येण्यासाठी राहुरी खुर्द वरून जावे लागत होते. त्यामुळे, तीन किलोमीटर अंतर वाढले होते. शालेय विद्यार्थी यांची मोठी गैरसोय झाली होती.
मागील आठवड्यात देसवंडीचे सरपंच दीपक खेवरे, अरुण कल्हापुरे, प्रवीण शिरसाठ व इतर ग्रामस्थांनी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची भेट घेऊन, नदीपात्रातील रस्ता तयार करून देण्याची मागणी केली होती.
राज्यमंत्री तनपुरे यांनी नदीपात्रात प्रत्यक्ष पाहणी करून, रस्त्याच्या कामासाठी पोकलेन मशीन व सिमेंटच्या नळ्या उपलब्ध करून दिल्या. आज रस्त्याचे काम पूर्ण झाले. ग्रामस्थांना जवळचा मार्ग खुला झाला. त्यामुळे, ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. अहमदनगर