esakal | पवार टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करतात बरं का... नीलेश राणे-रोहित पवार वादात मंत्री तनपुरेंची उडी
sakal

बोलून बातमी शोधा

RANE-ROHIT PAWAR CONTRAVERCY

नीलेश राणे यांनी साखर उद्योगाला किती मदत द्यायची, असा सवाल केला होता. त्यावर रोहित पवार यांनी ट्विट करीत साखरेसह कुक्कुटपालनालाही मदत मागितली आहे, असे प्रत्युत्तराचे ट्विट केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदीही त्यांचा सल्ला घेतात, याचीही आठवण करून दिली होती.

पवार टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करतात बरं का... नीलेश राणे-रोहित पवार वादात मंत्री तनपुरेंची उडी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नगर ः माजी खासदार नीलेश राणे आणि कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्यात सध्या ट्विटयुद्ध सुरू आहे. रोहित पवार यांच्यावर राणे यांनी एकेरीवर येत टीका केली होती. मात्र, रोहित यांनी त्यांना आपल्या स्टाईलने उत्तर दिले होते. हे ट्विटयुद्ध सुरू असतानाच राष्ट्रवादीचे युवा मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी या युद्धात उडी घेतली आहे. त्यामुळे हा वाद आणखी वाढणार हे नक्की. कारण त्यांनी केलेले ट्विट नक्कीच राणेंना जिव्हारी लागू शकते.

केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र पाठवून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काही साखर व इतर उद्योगाबाबत उपाययोजना सूचवल्या होत्या. परंतु नीलेश राणे यांनी साखर उद्योगाला किती मदत द्यायची, असा सवाल केला होता. त्यावर रोहित पवार यांनी ट्विट करीत साखरेसह कुक्कुटपालनालाही मदत मागितली आहे, असे प्रत्युत्तराचे ट्विट केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदीही त्यांचा सल्ला घेतात, याचीही आठवण करून दिली होती.

राणे यांना कुक्कुटपालन हा शब्द जिव्हारी लागला. त्यामुळे ते रोहित पवार यांच्यावर घसरले. त्यांचा एकेरी उल्लेख करीत पुन्हा ट्विट केले. त्या ट्विटला राष्ट्रवादीचे युवा मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी उत्तर दिले आहे. पवार आणि राणे यांच्या ट्विटयुद्धात ते पडले आहेत. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, पवार कुटुंब सभ्य आहे. ते अभ्यासू तर आहेत. परंतु सुसंस्कृतही आहेत. मात्र, टप्प्यात आले तर कार्यक्रमही करतात, असा सल्लाही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये दिला आहे. नीलेश राणे यांनी केलेल्या टीकेला रोहित पवार यांनी सभ्य भाषेत उत्तर दिले होते. खालच्या पातळीवर जाऊन टीका करणे चुकीचे असल्याचेही तनपुरे म्हणतात.

तनपुरे हे राहुरी-नगर तालुका मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. पहिल्यांदाच आमदार झाल्यानंतर त्यांना मंत्रीपद मिळाले आहे. ते राष्ट्र्वादीतील दिग्गज नेते जयंत पाटील यांचे भाचे आहेत. उच्च विद्याविभूषित मंत्री म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. ट्विटमध्ये त्यांनी उल्लेख केलेला कार्यक्रम हा शब्द राणे यांच्या जिव्हारी लागू शकतो.