मंत्री तनपुरे यांनी घेतली कृषी विद्यापीठ कर्मचाऱ्यांची भेट; आंदोलनात शेतकरी सेवा सुरू ठेवल्याबद्दल आभार 

विलास कुलकर्णी
Tuesday, 10 November 2020

महात्मा फुले कृषी विद्यापीठातील अधिकारी- कर्मचाऱ्यांचे सातव्या वेतन आयोगासह विविध मागण्यांसाठी बेमुदत आंदोलन सुरू आहे.

राहुरी (अहमदनगर) : महात्मा फुले कृषी विद्यापीठातील अधिकारी- कर्मचाऱ्यांचे सातव्या वेतन आयोगासह विविध मागण्यांसाठी बेमुदत आंदोलन सुरू आहे. आंदोलनाच्या चौदाव्या दिवशी नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आंदोलनस्थळी जाऊन कर्मचाऱ्यांची भेट घेतली. मागण्यांचे निवेदन स्वीकारले. कर्मचारी समन्वय समितीशी चर्चा करून, आंदोलन काळात शेतकऱ्यांना बियाणेविक्री व कृषी सल्ला सुरू ठेवल्याबद्दल मंत्री तनपुरे यांनी कर्मचाऱ्यांचे आभार मानले. 

सातवा वेतन आयोग, तसेच 10/20/30 वर्षांनंतर आश्वासित प्रगती योजना लागू करण्याच्या मागणीसाठी कृषी विद्यापीठातील अधिकारी- कर्मचाऱ्यांनी बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाचा आज चौदावा, तर "लेखणी बंद' आंदोलनाचा आठवा दिवस होता. काळ्या फिती लावून महात्मा फुले पुतळ्याजवळ, सामाजिक अंतर राखत आंदोलकांनी आज प्रचंड घोषणाबाजी केली. डॉ. उत्तम कदम, डॉ. महावीरसिंग चौहान, डॉ. संजय कोळसे, डॉ. कैलास कांबळे, डॉ. प्रकाश मोरे, सुरेखा निमसे, वैशाली तोडमल, शीतल जगदाळे, पी. टी. कुसळकर यांनी भूमिका मांडल्या. 

मंत्री तनपुरे यांनी आंदोलनस्थळी जाऊन समन्वय संघातर्फे मागण्यांचे निवेदन स्वीकारले. समन्वय संघाच्या पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली. कृषी विद्यापीठातील अधिकारी- कर्मचारी "लेखणी बंद' आंदोलन करीत असताना, शेतकऱ्यांसाठी कृषी सल्ला, तसेच बियाणेविक्री केंद्र सुरू ठेवल्याबद्दल कर्मचाऱ्यांना धन्यवाद दिले. डॉ. चौहान यांनी सातवा वेतन आयोग व आश्वासित प्रगती योजना लागू व्हावी, यावर पोवाडा व गीत सादर केले. 

डॉ. कदम म्हणाले, की आंदोलनाला आतापर्यंत दिली तशीच साथ पुढेही द्या. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन चालणार आहे. समन्वय संघाचे मच्छिंद्र बाचकर, गणेश मेहेत्रे, अजित हरिश्‍चंद्रे, महेश घाडगे, जनार्दन आव्हाड, संजय ठाणगे आदी उपस्थित होते. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Minister Tanpure visited the staff of the University of Agriculture