मंत्री थोरात म्हणाले, सरकार अडचणीत तरीही शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीर

सकाळ वृत्तसेवा
Monday, 26 October 2020

धांदरफळ बुद्रुक (धांदरफळ फाटा) येथे संगमनेर-अकोले रस्त्याच्या कामाच्या भूमिपूजनप्रसंगी मंत्री थोरात बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार डॉ. सुधीर तांबे होते.

संगमनेर ः महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर शेतकऱ्यांना सरसकट दोन लाखांपर्यंत कर्जमाफी दिली. नंतर कोरोना संकट, निसर्ग चक्रीवादळ, सततचा पाऊस, अशी विविध संकटे व लॉकडाऊनमुळे आर्थिक स्थिती मंदावलेली असतानाही, हे सरकार कायम शेतकरी व सर्वसामान्यांच्या पाठीशी उभे राहिले, असे प्रतिपादन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. 

धांदरफळ बुद्रुक (धांदरफळ फाटा) येथे संगमनेर-अकोले रस्त्याच्या कामाच्या भूमिपूजनप्रसंगी मंत्री थोरात बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार डॉ. सुधीर तांबे होते.

मंत्री थोरात म्हणाले, ""वर्षापूर्वी कॉंग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेचे महाविकास आघाडीचे सरकार आले. मंत्रीमंडळ विस्तार, खातेवाटपात काही काळ गेला. मार्चमध्ये आलेल्या कोरोनामुळे राज्याची आर्थिक स्थिती मंदावली. त्यानंतर निसर्ग चक्रीवादळ, विदर्भातील पूर परिस्थिती आणि सततचा पाऊस, अशी संकटांमागून संकटे आली.

उत्पन्नाचे सर्व स्रोत बंद असतानाही, महाराष्ट्र सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी हेक्‍टरी 10 हजार व फळबागांकरिता हेक्‍टरी 25 हजार रुपये मदत जाहीर केली आहे.'' 

आमदार डॉ. सुधीर तांबे म्हणाले, की जीएसटी, नोटाबंदीमुळे देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली. त्यात कोरोनाचे संकट आले. सध्या देशाचा जीडीपी वजा सहा आहे. खरेतर भाजप सरकार हीच देशावर आलेली मोठी आपत्ती आहे. मागील पाच वर्षांत विकासकामे करण्याऐवजी धार्मिक भावना भडकावून द्वेषाचे राजकारण वाढवले आहे. 

अकोले ते संगमनेर या 82 किलोमीटर रस्त्याच्या कामासाठी 168 कोटी रुपये मिळाले असून, रस्त्याचे काम जलदगतीने काम होणार असल्याने या परिसरातील नागरिकांची मोठी सोय होणार आहे. या वेळी रामहरी कातोरे, नीशा कोकणे, संपतराव डोंगरे, विष्णुपंत रहाटळ, अजय फटांगरे, वसंतराव देशमुख, विश्वास मुर्तडक, बाळासाहेब देशमाने, अनिल काळे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन दत्ता कासार यांनी केले. अनिल काळे यांनी आभार मानले. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Minister Thorat said that the government is firmly behind the farmers even in difficult times