esakal | त्यांना मुख्यमंत्र्यांचे पाय धरताना आम्ही पाहिलंय...मंत्री थोरातांचा विखे पाटलांवर प्रतिहल्ला

बोलून बातमी शोधा

Minister Thorat's counter-attack on Vikhe Patil

सुरवातीला या टिकेला फार महत्व देण्याची आवश्यकता नाही, अशी भूमिका घेतली. नंतर मात्र, पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना मंत्री थोरात यांनी खणखणीत प्रत्युत्तर दिलेच.

त्यांना मुख्यमंत्र्यांचे पाय धरताना आम्ही पाहिलंय...मंत्री थोरातांचा विखे पाटलांवर प्रतिहल्ला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा
संगमनेर : मागील पाच वर्षाच्या काळात काँग्रेसमध्ये असताना, विरोधीपक्ष नेते म्हणून भुमिका बजावलेल्यांना मुख्यमंत्र्यांच्या पाया पडताना आम्ही पाहिले आहे. अशांनी माझ्यावर टीका करु नये. त्यांचे विरोधी पक्ष नेते म्हणून पाच वर्षातले काम महाराष्ट्रातील जनतेने पाहिले आहे. ही टीका त्यांनाच अधिक लागू पडते, असा जोरदार हल्ला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली. भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याच्या विश्रांतीगृहात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

काल आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी ठाकरे सरकारमध्ये काँग्रेस नेते आणि मंत्र्यांना कोणी विचारीत नाही. काँग्रेसचा एवढा लाचार प्रदेशाध्यक्ष आपण पहिल्यांदा पहात आहोत, अशा शब्दात बाळासाहेब थोरातांवर निशाणा साधला होता. त्यावर थोरात आजच्या पत्रकार परिषदेत बोलणे अपेक्षितच होते. 

हेही वाचा - काँग्रेसचा एवढा लाचार प्रदेशाध्यक्ष पाहिला नाही - थोरात-विखे पाटलांमध्ये भाऊबंदकी

सुरवातीला या टिकेला फार महत्व देण्याची आवश्यकता नाही, अशी भूमिका घेतली. नंतर मात्र, पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना त्यांनी खणखणीत प्रत्युत्तर दिलेच.

कोणी सांगितले आमच्यात मतभेद 
शिवसेनेच्या मुखपत्रातील अग्रलेखाबाबतच्या प्रश्नाला त्यांना काहीतरी पाहिजे ना त्यामुळं वातावरण आल्हाददायक होतं अशा शब्दात अलगद बगल दिली. मात्र,सत्तेत असलेल्या काँग्रेसची नाराजी ही माध्यमांची चर्चा आहे. मुख्यमंत्र्यांशी सर्व बाबतीत सकारात्मक चर्चा झाली आहे. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. कोरोना काळात जनतेची काळजी करणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या घरातील दुःखद घटनेमुळे ते व्यग्र होते. सरकार निष्क्रिय असल्याचा आरोप करीत, कधी काही घडतयं का यासाठी काहीजण देव पाण्यात बुडवून बसले आहेत. मात्र, आमचे सरकार भक्कम आहे अशी ग्वाही त्यांनी दिली.

चिनी वस्तूंवर बंदी हवी
चीनच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या 20 जवानांच्या कुटूंबाप्रती संवेदना व्यक्त करीत, चीनशी झालेला औद्योगिक करार हा केंद्र सरकारच्या अखत्यारितील विषय आहे. याचा निषेध म्हणून सर्व चिनी वस्तूंवर कठोर निर्बंध घालून वापर बंद केला पाहिजे. उभय देशातील व्यापारासंदर्भात केंद्र सरकार योग्य निर्णय घेईल. महाराष्ट्र त्यांच्याबरोबर असेल. कोरोनाच्या प्रादुर्भावाचा परिणाम थेट विकासकामे रखडण्यावर झाला आहे. 

संगमनेर गोल्डन ट्रॅगल्सशी जोडले जाईल
कामगारांची कमी व निधीचाही प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोनापासून वाचण्यासाठी प्रत्येकाने स्वतःची व कुटूंबाची काळजी घेतली पाहीजे. नाशिक पुणे मुंबई हा गोल्डन ट्रँगल असून, या रेल्वेमार्गामुळे संगमनेर देशाशी जोडले जाणार आहे. विमानतळाप्रमाणेच ही महत्वाची बाब आहे. हा प्रकल्प लवकर पूर्ण व्हावा अशी इच्छा आहे. काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांचा वाढदिवस काँग्रेस कमिटी सामाजिक उपक्रमातून साधेपणाने साजरा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.