आमदार बबनदादांना झाली कोरोनाची लागण, स्वतःच दिली माहिती

संजय आ. काटे
Sunday, 13 December 2020

कितीही मोठा प्रवास असो व रात्री कितीही उशिरा झोपले तरी पहाटेचा त्यांचा दोन तासांचा व्यायाम चुकत नाही.

श्रीगोंदे : भाजपा नेते व श्रीगोंदे विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनराव पाचपुते हे कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतःच सोशल मीडियात पोस्ट शेअर करीत ही माहिती दिली. त्यांच्या कुटुंबासह संपर्कात आलेल्या इतर व्यक्तींची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे.

गेली चाळीस वर्षे श्रीगोंदे मतदारसंघात सक्रिय असणारे आणि राजकारणासोबतच व्यायामाला सर्वाधिक महत्व देणारे आमदार पाचपुते यांना आज कोरोनाने गाठले. दोन दिवसांपासून त्यांना किरकोळ लक्षणे दिसत असल्याने त्यांनी केलेली कोरोना चाचणी आज पॉझिटिव्ह आली.

खबरदारी म्हणून पाचपुते यांनी स्वतःच पोस्ट शेअर करून काही दिवसात त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना कोरोना चाचणी करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार त्यांच्या कुटुंबातील सदस्य व जवळच्या व्यक्तींनी कोरोना चाचणी केली त्यात सगळेच निगेटिव्ह आले आहेत. पाचपुते हे व्यायामाला विशेष महत्व देतात.

कितीही मोठा प्रवास असो व रात्री कितीही उशिरा झोपले तरी पहाटेचा त्यांचा दोन तासांचा व्यायाम चुकत नाही. त्यामुळे याही वयात एक फिट आमदार म्हणून त्यांच्याविषयी कौतुकाचा आणि आदराची चर्चा विरोधकही करीत असतात.

सततच्या प्रवास व लोक संपर्कामुळे त्यांना कोरोनाची लागण झाली. तथापि त्यातून ते कोरोनाला सर्वात जलद गतीने हरवतील अशी खात्री सर्वानाच आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Babandada Pachpute was infected with corona