
शहरात वाहतुकीचाही प्रश्न गंभीर आहे. असे प्रश्न विधानसभेत कसे मांडायचे? कोठला बसस्थानकाजवळ महामार्गावर वाहने पार्किंग केली जातात. शहरातील मोकाट जनावरांवर कारवाई करा
नगर ः जिल्हाधिकारी कार्यालयात आज पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कोरोना व अन्य विषयांवर आढावा बैठक घेतली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत पालकमंत्री मुश्रीफ बोलत असतानाच, आमदार संग्राम जगताप यांची "एन्ट्री' झाली. त्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक व महापालिका आयुक्तांच्या कामाबाबत त्यांच्या हजेरीतच पालकमंत्री मुश्रीफ यांच्याकडे तक्रारी केल्या. शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न सोडविण्याची मागणी मंत्री मुश्रीफ यांच्याकडे केली.
जगताप म्हणाले, ""लॉकडाउनमधून शिथिलता दिल्यापासून शहर परिसरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. केडगाव परिसरात चोऱ्यांचे प्रकार वाढल्याने नागरिक समूहाने जागे राहून रात्रीचा पहारा देत आहेत. ही स्थिती शहराची असेल, तर ग्रामीण भागाची काय अवस्था असेल? केडगाव येथे दिवसा घरात दरोडेखोर घुसण्याचा प्रयत्न करतात.
या बाबत तक्रार देण्यासाठी नागरिक गेले असता, कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवून घेतली जात नाही. उलट, फिर्याद देऊ नका, असे पोलिस म्हणतात.
शहरात वाहतुकीचाही प्रश्न गंभीर आहे. असे प्रश्न विधानसभेत कसे मांडायचे? कोठला बसस्थानकाजवळ महामार्गावर वाहने पार्किंग केली जातात. शहरातील मोकाट जनावरांवर कारवाई करा, असे महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांना गेल्या चार महिन्यांपासून सांगत आहे. मात्र, त्यांच्या पथकाने एकही जनावर पकडलेले नाही.
ही मोकाट जनावरे महामार्गावर बसतात. त्यातून वाहतूककोंडी, अपघातांचे प्रकार होत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्ता तीन वर्षांपूर्वी मंजूर झाला होता. अजूनही त्याचे काम झालेले नाही. निधी असूनही कामे होत नाहीत.
या संदर्भात चार महिन्यांपासून पाठपुरावा करीत आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी सायंकाळी सहानंतर नागरिकांना स्वतःचे संरक्षण करावे लागत असेल, तर यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट नसल्याचे जगताप म्हणाले.