आमदार लहामटे त्या मटण पार्टीबाबत म्हणाले, मी दारू पिलो नाही, फक्त मटण खाल्लं...ते सुद्धा आता बंद

शांताराम काळे
रविवार, 19 जुलै 2020

आज सोशल मीडियावर त्यांनी विरोधकांच्या प्रश्नांना व आरोपांना उत्तरे दिली. काल भाजपच्या वतीने आमदार लहामटे यांच्याविरोधात पत्रक काढून मटण पार्टीबाबत सवाल केले होते. त्या पार्टीतील एक बाधित निघाला आहे. त्यावरून राजकारण पेटले आहे

अकोले : मी मित्राच्या अग्रहाखातर मांसाहार करण्यासाठी गेलो होतो. मात्र, विरोधकांनी दारू व मांसाहार पार्टी म्हटले. हे चुकीचे असून, मी तर दारू घेतच नाही पण मांसाहार करत होतो. तोही आजपासून करणार नाही, अशी प्रतिज्ञा अकोल्याचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी केली आहे.

भाजपवाल्यानीच मटण खायचे शिकवलं

आज माझ्यावर जे भाजप नेते आरोप करतात, त्यांनीच मला मांसाहार करायचे शिकवले. त्यांना तर हा प्रकार रोजच चालतो तर मला जनतेने पाठिंबा देऊन वर्गणी काढून निवडून  आणले. जसा यावेळी निवडून आलो तसाच पुढच्या विधानसभेतही निवडून येणार त्याची काळजी विरोधकांनी करू नये. असा खुलासा आमदार डॉ. किरण लहामटे यांनी केला आहे. 

सोशल मीडियाद्वारे दिले विरोधकांना उत्तर

आज सोशल मीडियावर त्यांनी विरोधकांच्या प्रश्नांना व आरोपांना उत्तरे दिली. काल भाजपच्या वतीने आमदार लहामटे यांच्याविरोधात पत्रक काढून मटण पार्टीबाबत सवाल केले होते.

मी टेस्ट केली

माझी बदनामी विरोधक करत अाहेत. मी मांसाहाराच्या जेवणासाठी मित्राकडे गेलो असताना जे मित्र कोरोनाबाधित झाले त्यांच्याशी संपर्क झाला नाही तरीदेखील मी संगमनेरला जाऊन रॅपिड टेस्ट करून घेतली.

त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे तरीदेखील सरकारी नियम तोडले असतील तर सरकारने व प्रशासनाने मला संस्थात्मक क्वारंटाईन करावे. मी क्वारंटाईन होण्यास तयार आहे. मात्र, विरोधकांनी मला शहाणपण शिकवू नये.

आईचे दूध पिले असाल तर दोन नंबर बंद करा

माझ्या मित्र परिवाराने मला कार दिली. तिचे हप्ते मी माझ्या पगारातून फेडणार आहे. पिंपरकणे पुलाचे पहाटे नारळ फोडून पूजन केले. मी विरोधकांचा कर्दनकाळ अाहे. आईचे दूध पिले असाल तर दोन नंबर बंद करून दाखवा, असे विरोधकांना आव्हान देतानाच लहामटे म्हणाले, एमआयडीसी करणारच आहे.

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Lahamate says, I did not drink alcohol, I only ate meat