esakal | आमदार-पोलिस निरीक्षकांत खडाजंगी; बैठक सोडून जाण्याची सूचना
sakal

बोलून बातमी शोधा

MLA Lahu Kanade

आमदार-पोलिस निरीक्षकांत खडाजंगी; बैठक सोडून जाण्याची सूचना

sakal_logo
By
टीम ई सकाळ

राहुरी (जि. नगर) : देवळाली प्रवरा येथे आढावा बैठकीत आमदार लहू कानडे व पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्यात जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली. आमदारांच्या सूचनेवरून पोलिस निरीक्षक दुधाळ बैठक सोडून निघून गेले. त्यानंतर संतप्त आमदार कानडे यांनी बैठकीत इतर अधिकाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेतली.‌ (MLA Lahu Kanade and police inspector Nandkumar Dudhal had a heated argument)

नेमके काय घडले?

बैठकीच्या प्रारंभी विषयसूचीवरून आमदार कानडे यांनी नायब तहसीलदार गणेश तळेकर यांना धारेवर धरले. देवळाली प्रवरा येथे शनिवारी (ता. १७) मध्यरात्री तब्बल आठ ठिकाणी घरफोड्या झाल्या. पोलिसांची रात्रीची गस्त असताना घरफोड्या कशा झाल्या, असा थेट प्रश्न पोलिस निरीक्षक दुधाळ यांना विचारला. त्यावर, ‘गुन्हा नोंदविला आहे. तपासासाठी पथके तयार केली आहेत. गस्तीच्या पोलिसांकडून खुलासा मागितला आहे,’ असे उत्तर दुधाळ यांनी दिले. ‘चोरट्यांनी पाच तास धुमाकूळ घातला, ही वस्तुस्थिती वृत्तपत्रात आली आहे. मी लोकप्रतिनिधी आहे. तुमचा कॉन्स्टेबल नाही,’ असे खडे बोल आमदार कानडे यांनी सुनावले. त्यावर दुधाळही संतप्त झाले. ‘तुम्ही आमदार आहात. असे अंगावर धावून आल्यासारखे बोलू नका. मीही शासकीय अधिकारी आहे. २५ वर्षांपासून सेवेत आहे. तुमची बोलण्याची पद्धत बरोबर नाही,’ असे उत्तर त्यांनी दिले. आमदार कानडे यांनी दुधाळ यांना, बैठकीस थांबण्याची गरज नाही, असे सांगितल्यावर दुधाळ यांनी काढता पाय घेतला. त्यामुळे बैठक चांगलीच गाजली.

देवळाली प्रवरा येथे सोमवारी (ता. १९) पालिका सभागृहात श्रीरामपूर मतदारसंघाच्या, राहुरी तालुक्यातील ३२ गावांच्या आढावा बैठकीत वरील प्रकार घडला. नगराध्यक्ष सत्यजित कदम, नायब तहसीलदार गणेश तळेकर, गटविकास अधिकारी गोविंद खामकर, तालुका आरोग्य अधिकारी दीपाली गायकवाड आदी उपस्थित होते.

गैरहजर अधिकाऱ्यांना नोटिसा काढा

बैठकीस गैरहजर अधिकाऱ्यांना नोटिसा काढण्याचे आदेश आमदार लहू कानडे यांनी नायब तहसीलदारांना दिले. पाणीपुरवठा योजनेसाठी शासनाचा आठ कोटींचा निधी अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे परत गेल्याचा आरोपही त्यांनी केला.

(MLA Lahu Kanade and police inspector Nandkumar Dudhal had a heated argument)

loading image