पारनेर तालुक्यात आमदार लंकेंचा बिनविरोधचा वारू सुसाट

सकाळ वृत्तसेवा
Monday, 21 December 2020

लंके म्हणाले, की सारोळा अडवाई ग्रामस्थांनी दाखविलेली तत्परता कौतुकास्पद आहे. निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर तातडीने मुळा धरणावरून पाणीयोजना राबवून महिलांच्या डोक्‍यावरील हंडा कायमस्वरूपी उतरविणार आहे.

भाळवणी : गावातील एकोपा टिकून राहावा, यासाठी आमदार नीलेश लंके यांनी केलेल्या बिनविरोध ग्रामपंचायतीच्या आवाहनास चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. लंके यांच्या उपस्थितीत भाळवणी येथे परिसरातील गावप्रमुखांची बैठक झाली. तीत सारोळा अडवाई व भांडगाव येथील निवडणूक बिनविरोध झाली. सर्वानुमते सदस्यांची निवड करण्यात आली. 

माजी सरपंच देविदास आबुज, दत्तात्रेय महांडुळे, बबन फंड, परशूराम फंड, रमेश आबुज, शंकर महांडुळे, सतीश महांडुळे आदी उपस्थित होते. सारोळा अडवाई येथील ग्रामस्थांनी कोणतीही खलबते न करता, अवघ्या दोन मिनिटांत सदस्यांची निवड करीत एकोपा दाखवून दिला.

लंके म्हणाले, की सारोळा अडवाई ग्रामस्थांनी दाखविलेली तत्परता कौतुकास्पद आहे. निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर तातडीने मुळा धरणावरून पाणीयोजना राबवून महिलांच्या डोक्‍यावरील हंडा कायमस्वरूपी उतरविणार आहे. देविदास आबूज यांनी पाणंद रस्त्याचा प्रश्न मांडला.

भांडगाव येथील ग्रामस्थांनीही बिनविरोध निवडणुकीवर शिक्कामोर्तब केले. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब तरटे, सुरेश धुरपते, दत्तात्रेय खरमाळे आदी उपस्थित होते. 
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Lanka's response to the campaign in Parner taluka