आमदार लंकेंचे पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण सॉफ्टवेअर, गृहमंत्र्यांनी केले उदघाटन

मार्तंड बुचुडे
Thursday, 10 September 2020

आमदार निलेश लंके प्रतिष्ठाणच्यावतीने पोलीस भरती पूर्व व्हर्च्युअल प्रशिक्षण सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे. राज्यातील सर्वात मोठ्या डिजिटल ॲकॅडमीद्वारे पंचवीस हजार उमेदवारांना मोफत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

पारनेर (नगर): आमदार निलेश लंके प्रतिष्ठाणच्यावतीने पोलीस भरती पूर्व व्हर्च्युअल प्रशिक्षण सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे. राज्यातील सर्वात मोठ्या डिजिटल ॲकॅडमीद्वारे पंचवीस हजार उमेदवारांना मोफत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. आत्तापर्यंत 10 हजार तरूणांनी प्रवेश घेतला आहे. या 'खाकी' अप्लिकेशन सॉफ्टवेअरचे उद्घाटन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते मुंबईत नुकतेच झाले. हा भरतीपुर्व व्हर्च्युअल प्रशिक्षणाचा पॅटर्न भरतीनंतर सरकारसुद्धा राबविणार असल्याचे यावेळी देशमुख यांनी सांगितले.

राज्यात साडेबारा हजारांपेक्षा अधिक जागांसाठी पोलिस भरती होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फिजिकल ॲकॅडमी बंद असल्याने पर्याय म्हणून निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने राज्यातील पहिली व्हर्च्युअल अकॅडमी सुरू केली आहे. त्यासाठी तयार केलेल्या खाकी अप्लिकेशन सॉफ्टवेअरचे उद्घाटन राज्याचे गृहमंत्री देशमुख यांच्या हस्ते बुधवारी (ता. 9 ) करण्यात आले. 

राज्यातील तरूण-तरूणींना तीन महिने मोफत ऑनलाईन प्रशिक्षण दिले जाणार आहे. पोलिस दलातील कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्यासाठी लवकरच पोलिस भरती होणार आहे. त्यासाठी अनेकांनी अर्जही दाखल केले आहेत. कोरोनाच्या महामारीमुळे भरती प्रक्रिया झाली नाही. वर्षाअखेर पोलिस भरती प्रक्रिया करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. पोलिस खात्यात भरती होण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र त्यासाठी सराव व मार्गदर्शनाची गरज असते. राज्यात  अनेक खाजगी अकॅडमी असून तेथे शुल्क प्रशिक्षण दिले जाते. मात्र कोरोनामुळे त्या बंद आहेत. त्यामुळे मुलांची अडचण झाली आहे.

तंत्रस्नेही शिक्षक संदीप गुंड यांच्या सहकार्याने प्रतिष्ठानने पुढाकार घेऊन राज्यातील पहिली डिजिटल पोलीस भरती ॲकॅडमी सुरू केली आहे. राज्यातील सर्व उमेदवारांना मोफत प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने येथे दिले जाणार आहे. गृहमंत्र्यांच्या दालनात बुधवारी या व्हर्च्युअल ॲकॅडमीचे उद्घाटन झाले. त्यावेळी आमदार निलेश लंके, संदीप गुंड, अॅड. राहुल झावरे, सरपंच ठकाराम लंके, प्रतिष्ठानचे तालुकाध्यक्ष बापू शिर्के, कारभारी पोटघन उपस्थित होते.

या प्रशिक्षणाला 15 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. त्यासाठी पोलीस व्हर्च्युअल ॲकॅडमी हे विशेष अप्लिकेशन सॉफ्टवेअर निर्माण केले आहे.15 सप्टेंबर ते 14 डिसेंबर 2020 असे  तीन महिन्याचे दर्जेदार आणि खडतर प्रशिक्षण प्रशिक्षणार्थींना दिले जाणार आहे. नोंदणीसाठी पोस्ट खालील Apply now या बटनावर क्लिक करावे. किंवा 9075727561 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

आमदार निलेश लंके म्हणाले, पोलीस भरतीसाठी इच्छूक तरूणांना योग्य मार्गदर्शक व प्रशिक्षण मिळावे, याकरता व्हर्च्युअल पोलीस ॲकॅडमी प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहे. गृहमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. राज्यातील 25 हजार उमेदवारांना प्रशिक्षण देण्याचा मानस आहे. आतापर्यंत दहा हजार जणांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे.

संपादन - सुस्मिता वडतिले  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Nilesh Lanke Pratishthan has developed pre Police recruitment virtual training software