भाजप कोणत्याही विषयात राजकारण करु शकते; मंदिर उघडण्याबाबत सरकार काय निर्णय घेते पाहू

अशोक मुरुमकर
Friday, 28 August 2020

सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व आरोग्यमंत्री, योग्य तो निर्णय घेतील.

अहमदनगर : सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व आरोग्यमंत्री, योग्य तो निर्णय घेतील. पण मंदिराबाबत फक्त अर्थकारण एवढाच विषय नाही तर आरोग्य सुद्धा महत्त्वाचे आहे. त्यामुळे मंदिर उघडण्याबाबत सरकार काय निर्णय घेते, ते पाहू. मात्र, भाजप हे कुठल्याही विषयात राजकारण करू शकते, हे सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे उद्याचे आंदोलन सुद्धा राजकारण डोक्यात ठेवूनचे असावे, असे माझ्या सारख्याला वाटते, असे आमदार रोहित पवार म्हणाले आहेत.

नगरमध्ये ते बोलत होते. याबाबतचे वृत्त एका संकेतस्थळावर प्रसिद्ध झाले आहेआमदार पवार म्हणाले, भाजप कोणत्याही विषयात राजकारण करु शकते हे सर्वांनाच माहित आहे. उद्या त्यांचे जे आंदोलन आहे, ते राजकारण डोक्यात ठेवूनच असावे. भाजपला महाराष्ट्राचा, राज्यातील नागरिकांचा कळकळा असता तर त्यांनी जीएसटीचे पैसे वेळेत मिळावे, यासाठी एकदा तरी पाठपुरावा केला असता.

कोरोनाचा रुग्ण सापडला तेव्हापासून त्याचा प्रादूर्भव रोखावा म्हणून राज्यातील मंदिरे करण्यात बंद करण्यात आली आहेत. ही मंदिरे उघडण्यात यावी, यासाठी भाजपकडून आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनावरून आमदार पवार यांनी भाजपचा समाचार घेत यांच्यावर तोफ डागली.

आमदार पवार म्हणाले, मंदिराच्या अवतीभवती जी दुकाने आहेत, जे अर्थकारण आहे, त्याचा विचार केला व धार्मिक भावनांच्या बाबतीत विचार केला, तर मंदिर हे उघडावी, हे माझेही म्हणणे होते. मी त्याच्यावर ही बोललो होतो. पण आपली मंदिरे बघितली तर त्यांचा गाभारा लहान असतो, आणि भावनेच्या भरात तेथे लोकांची गर्दी वाढली. त्यामुळे आरोग्याच्या अडचणी येऊ शकतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Rohit Pawar criticizes BJP leaders for opening temple