हॅलो, रोहितदादा पूलच वाहून गेलाय, आलोच म्हणत भरपावसात आमदार गावात हजर

दत्ता उकिरडे
Monday, 12 October 2020

काही तासांत आमदार भरपावसात घटनास्थळी हजर होतात आणि त्यावर उपाय योजनाही करतात. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे करपडी (ता.कर्जत) येथील मुख्य रस्त्यावरील ओढ्यावर असलेला पूल अतिवृष्टीमुळे वाहून गेला. त्यामुळे करपडी गावचा संपर्क तुटला.

राशीन : हॅलो रोहितदादा...कालच्या पुरामुळे गावचा पुलच वाहुन गेला...अन् सगळा संपर्क तुटलाय! अशा आशयाचा आमदार रोहित पवारांना फोन काय जातो अन् त्यावर आमदार पवारांचा रिप्लाय येतो 'आलोच!

काही तासांत आमदार भरपावसात घटनास्थळी हजर होतात आणि त्यावर उपाय योजनाही करतात. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे करपडी (ता.कर्जत) येथील मुख्य रस्त्यावरील ओढ्यावर असलेला पूल अतिवृष्टीमुळे वाहून गेला. त्यामुळे करपडी गावचा संपर्क तुटला.

यावेळी अॅड. सुरेश शिंदे यांनी आ.रोहित पवार यांना याबाबत फोनवर माहिती दिली. आणि कामानिमित्त पुणे या ठिकाणी असलेले आ.पवार काही तासातच करपडीच्या घटनास्थळी पोहोच झाले.

आ. पवारांनी तेथील ग्रामस्थांना धीर देत भर पावसात पुरात वाहून गेलेल्या पुलाची पाहणी केली. ओढ्यातील पाणी ओसरल्यानंतर तात्काळ सिमेंटचे पाईप उपलब्ध करून जेसीबीच्या साहाय्याने त्यावर मुरुमीकरणाचा भरावा करून घेऊ' असा तोडगा काढला.

सध्या या ठिकाणी पुलाला मंजुरी मिळाली आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निधी उपलब्ध होऊ शकला नाही. येथील अडचणी जाणून घेत नाबार्ड अंतर्गत विशेषनिधी उपलब्ध करून पुलाची उंची वाढवून घेता येईल. पुढील काळात कितीही मोठी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली तरी वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही, असे आश्वासन आ.रोहित पवार यांनी दिले.

यावेळी राष्ट्रवादी लिगल सेलचे जिल्हाध्यक्ष अॅड.सुरेश शिंदे, उपसभापती हेमंत मोरे, श्याम कानगुडे, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष नितीन धांडे,उद्योजक पंढरीशेठ काळे, माऊली सायकर, शिवाजी देशमुख, वैभव काळे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

करपडीकरांनी 'याचसाठी केला होता अट्टाहास'!
करपडीचा हा पुल पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाल्यास अनेकवेळा पाण्याखाली जाऊन जनसंपर्क तुटलेला आहे. अॅड.सुरेश शिंदे व ग्रामस्थांकडुन रास्तारोको आंदोलन करून तत्कालीन पालकमंत्र्यांना पुलाच्या मागणीसाठी अडवण्यात आले होते. त्यावेळी आश्वासन देण्यात आले. मात्र, अद्याप पूल झाला नाही. आता रोहित पवारांच्या माध्यमातून पुलाला मंजुरी मिळाली. त्याबाबतच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

संपादन - अशोक निंबाळकर
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Rohit Pawar to help people in rains