esakal | आमदार रोहित पवारांनी केंद्राकडून केली २२ हजार कोटींची अपेक्षा
sakal

बोलून बातमी शोधा

GST

राज्याच्या आर्थिक अडचणीत भर पडली, त्यामुळे केंद्राने जीएसटीची थकीत रक्कम देण्याची मागणी आमदार पवार यांनी ट्विटवरुन केली आहे.

आमदार रोहित पवारांनी केंद्राकडून केली २२ हजार कोटींची अपेक्षा

sakal_logo
By
अशोक मुरुमकर

अहमदनगर : मार्चपासून राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. आता लॉकडाऊनमध्ये शिथीलता आणली असली तरी अद्यापही व्यवहार सुरुळीत झालेले नाहीत. याचा परिणाम राज्याच्या तिजोरीवर पडला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने महाराष्ट्राची थकीत जीएसटीची २२ कोटीची रक्कम द्यावी, अशी अपेक्षा कर्जत- जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी केली केली आहे.
 
कोरोनामुळे राज्यात मार्चपासून लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे उद्योग व व्यवसाय बंद होते. यातून सरकारला येणाऱ्या महसूलावर परिणाम झाला आहे. सध्या अपवाद वगळता उद्योगधंदे सुरु करण्यासाठी परवानगी दिली आहे. मात्र, अजूनही त्यावर परिणाम दिसत आहे. कोरोनाचे रुग्ण वाढू नयेत म्हणून लॉकडाऊन लागला. तेव्हा राज्यातील एसटीही बंद केली होती. आता एसटी सुरु असली तरी अद्याप प्रवाशांचा पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नाही. यातून एसटीलाही तोटा सहन करावा लागत आहे.

राज्याच्या आर्थिक अडचणीत भर पडली, त्यामुळे केंद्राने जीएसटीची थकीत रक्कम देण्याची मागणी आमदार पवार यांनी ट्विटवरुन केली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, ‘Covid19 मुळं राज्यांच्या आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. एकट्या महाराष्ट्राची 22 हजार कोटींहून अधिक #GST भरपाई प्रलंबित आहे. राज्यांची ही तूट भरून काढण्यासाठी कर्ज घेण्याची अपेक्षा करणे निषेधार्ह आहे. उद्या होणाऱ्या GST परिषदेच्या बैठकीत या समस्या सोडवल्या जातील, अशी अपेक्षा आहे.’

संपादन : सुस्मिता वडतिले