आमदार रोहित पवार यांची कर्जतसाठी घोषणा... बुधवारपासून

नीलेश दिवटे
Monday, 20 July 2020

कोरोनाचे संकट घोंगाऊ लागले असून ही साखळी खंडित व्हावी म्हणून बुधवारपासून शहरात अत्यंत कडक जनता कर्फ्यु लागू करण्यात येणार आहे.

कर्जत (अहमदनगर) : कोरोनाचे संकट घोंगाऊ लागले असून ही साखळी खंडित व्हावी म्हणून बुधवारपासून शहरात अत्यंत कडक जनता कर्फ्यु लागू करण्यात येणार आहे. नियमांचा भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. प्रशासनास सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन आमदार रोहित पवार यांनी केले आहे. 

शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला असून यावर नियंत्रण मिळविण्यासाठी आमदार पवार यांनी  अधिकारी, पदाधिकारी व व्यापारी यांची आढावा बैठक घेतली. यावेळी प्रांताधिकारी अर्चना नष्टे, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव, तहसीलदार नानासाहेब आगळे, गटविकास अधिकारी अमोल जाधव, मुख्याधिकारी गोविंद जाधव, पोलिस निरीक्षक सुनील गायकवाड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप पुंड, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुले, नगराध्यक्षा प्रतिभा भैलूमे, नगरसेवक सचिन घुले, डॉ. संदीप बरबडे, मनीषा सोनमाळी, बापूसाहेब नेटके, दीपक शहाणे, व्यापारी असोसीएशनचे अध्यक्ष अर्जुन भोज, तात्यासाहेब ढेरे, संतोष म्हेत्रे, महावीर बोरा, नितीन धांडे, भास्कर भैलूमे, ओंकार तोटे उपस्थित होते.

आमदार पवार म्हणाले, सर्वांनी एकत्रितपणे कोरोनाचा सामना करण्यासाठी प्रशासन जीव धोक्यात घालून प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू आहे. नागरिकांनी सुद्धा काही नियम आणि बंधने लावून घेतली पाहिजेत. इतर तालुक्यांच्या तुलनेत आपली परिस्थिती आटोक्यात असली तरी कोरोना साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी सहकार्य न केल्यास भविष्यात जामखेड सारखी परिस्थिती उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वेळीच सावध व्हा.

 
शहरात काही दिवसात कोरोनाचे पाच रुग्ण आढळले असून आज शहरातील एका वृद्धाचे निधन झाले आहे. या पार्श्वभूमीवर येथे आमदार पवार यांनी तातडीने आढावा बैठक घेतली. यामध्ये विविध पदाधिकाऱ्यांनी अनेक अडचणी मांडत उपाययोजना सुचवल्या. सात दिवस कडक जनता कर्फ्यु लागू करण्याबाबत सर्वांची मान्यता घेण्यात आली. रथयात्रा तीन दिवस आणि नंतर वाढीव तीन दिवस ते संपल्यावर सात दिवसांचा कडक जनता कर्फ्यु लागू करण्यामुळे हातावर पोट असणाऱ्या काही कामगार व इतरांचे हाल होणार आहेत. मात्र त्यांच्यासाठी मदतीचा हात लोकप्रतिनिधी म्हणून देणे हे माझे कर्तव्य असून त्याबाबत किट संबंधितांना प्रशासकीय यंत्राने मार्फत घरपोहोच देण्यात येईल असे, पवार यांनी स्पष्ट केले.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Rohit Pawar said Janta curfew in Karjat taluka again from Wednesday