आमदार संग्राम जगताप म्हटले - वीजबिल दुरुस्त होईपर्यंत मुदतवाढ द्या

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 27 June 2020

महावितरणकडून वीजग्राहकांना देण्यात आलेल्या, लॉकडाउन काळातील वीजबिलात दुरुस्ती होईपर्यंत वीजबिल भरण्यास मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे केली आहे.

नगर : महावितरणकडून वीजग्राहकांना देण्यात आलेल्या, लॉकडाउन काळातील वीजबिलात दुरुस्ती होईपर्यंत वीजबिल भरण्यास मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे केली आहे. या पत्राची प्रत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्‍त तनपुरे यांनाही पाठविली आहे. 

पत्रात म्हटले आहे, की कोरोना संकटामुळे राज्यात घोषित करण्यात आलेल्या लॉकडाउन कालावधीत वीज मीटर रीडिंगची नोंद न झाल्यामुळे महावितरणकडून वीजबिले एकत्रित व सरासरी स्वरूपात पाठविण्यात आली. त्याबाबत तक्रारीसाठी स्वतंत्र ऑनलाइन व्यवस्था केली आहे. तीन ते चार महिने सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिक, दुकानदार या सर्वांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले. आता लॉकडाउनमध्ये थोडी शिथिलता देण्यात आली आहे. असे असताना अचानक गेल्या दोन-तीन महिन्यांच्या एकत्रित वीजबिलाचा मोठा आर्थिक भुर्दंड सर्वसामान्य जनतेला सहन करावा लागत आहे. 

अचानक आलेले एकत्रित वीजबिल भरणे नागरिकांना आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. त्यामुळे वीजबिल दुरुस्ती झाल्यानंतर, तसेच सरासरी वीजबिल न घेता मासिक बिल स्वीकारण्यात आल्यास नागरिकांवर अचानक आलेला आर्थिक भुर्दंड टाळता येणे शक्‍य होईल. याबाबत तातडीने निर्णय घेण्यात यावा, जेणे करून सर्वसामान्य नागरिकांना वीजबिल भरणा न झाल्यामुळे वीजपुरवठा खंडित होण्याच्या कारवाईला सामोरे जावे लागणार नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Sangram Jagtap said - give extension till the electricity bill is fixed