आमदार संग्राम जगतापांमुळे नगरला मिळणार कोरोनाची इंजेक्शन

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 22 September 2020

जिल्हा रुग्णालयातील रेमडेसीवीरचा साठा संपल्याचे जिल्हा शल्यचिकित्सकांनी जाहीर केले आहे. खासगी रुग्णालयातही रेमडेसीवीर मिळत नाही.

नगर : जिल्हा रुग्णालयासह जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून रेमडीसीवीर इंजेक्‍शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यासाठी नातेवाईकांना धावपळ करावी लागत होती.

या बाबत आज आमदार संग्राम जगताप यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची मुंबईत भेट घेऊन निवेदन दिले. मंत्री टोपे यांनी तत्काळ वैद्यकीय सचिवांना इंजेक्‍शनचा पुरवठा करण्याचा आदेश दिला. 

निवेदनात जगताप यांनी म्हटले आहे, की गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनारुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. श्‍वसनाचा त्रास होणाऱ्या रुग्णांना रेमडेसीवीर इंजेक्‍शन अत्यंत गरजेचे आहे.

जिल्हा रुग्णालयातील रेमडेसीवीरचा साठा संपल्याचे जिल्हा शल्यचिकित्सकांनी जाहीर केले आहे. खासगी रुग्णालयातही रेमडेसीवीर मिळत नाही. त्यामुळे रुग्णांचा जीव धोक्‍यात आला आहे. रेमडेसीवीर मिळत नसल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. इंजेक्‍शन मिळविण्यासाठी नातेवाईक धावपळ करीत आहेत.

राज्यातील अन्य जिल्ह्यात रेमडीसीवीरचा मोठ्याप्रमाणात पुरवठा होता. त्या तुलनेत नगर जिल्ह्यात इंजेक्‍शनचा कमी पुरवठा होत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे नगर जिल्ह्यासाठी जास्तीत जास्त रेमडेसीवीर साठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली.

दरम्यान, यावेळी झालेल्या चर्चेनंतर आरोग्यमंत्री टोपे यांनी तत्काळ वैद्यकीय सचिवांना त्वरित जास्तीचा पुरवठा करण्याबाबत आदेश दिला. 

संपादन - अशोक निंंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Sangram Jagtap will give Ramdesvir injection to the town