Ahmednagar : नगरपंचायतीत मनसेला एक जागा द्यावी : थोरात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mns

नगरपंचायतीत मनसेला एक जागा द्यावी : थोरात

कर्जत : येत्या नगरपंचायत निवडणुकीत मनसेला एक जागा द्यावी, अशी मागणी शहराध्यक्ष नामदेव थोरात यांनी आमदार रोहित पवार यांच्याकडे केली. मनसेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात नमूद केले आहे की कर्जत नगरपंचायत निवडणूक जवळ येत आहे. शहरातील मध्यवर्ती भागात असणाऱ्या प्रभाग १३ मध्ये ग्रामदैवत संत श्रेष्ठ श्री. सद्गुरु गोदड महाराज यांची संजीवन समाधी मंदिर आहे. त्यामुळे या प्रभागाला खूप महत्त्व आहे.

या प्रभागातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कर्जत तालुकाध्यक्ष रविंद्र सुपेकर यांना उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी शहराध्यक्ष नामदेव थोरात यांनी आमदार रोहित पवार यांच्याकडे केली आहे. विधानसभा निवडणुकीवेळी आमदार रोहित पवार यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना कर्जत-जामखेड टीमने पाठिंबा दिला होता. हा पाठिंबा देताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शब्द दिला होता की येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला विश्वासात घेऊन निर्णय घेऊ. प्रभाग १३ मध्ये रविंद्र सुपेकर यांनी भरीव कामे केली आहेत, मागील निवडणुकीत पराभव झाला असताना कुठेही न डगमगता प्रभागातील जनतेची नाळ तुटून दिली नाही.

कोरोना काळात त्यांनी प्रभागांमध्ये मोफत किराणा वाटप, मोफत फिल्टर पाणी, दूध, भाजीपाला रस्त्यावरील खड्डे बुजविने असे विविध उपक्रम सातत्याने राबवले. त्यामुळे वरील सर्व गोष्टींचा विचार करून आमदार रोहित पवार यांनी विश्वास दाखवून या निवडणुकीमध्ये मनसेला एक जागा देऊन काम करण्याची संधी द्यावी, अशी मागणी केली.

loading image
go to top