हॅलोऽऽऽ हॅलोऽऽऽ आवाज येतोय; फोर जी फक्त नावालाच, प्रत्यक्ष समोरच्या व्यक्तीचा आवाजही येईना

गौरव साळुंके
Tuesday, 29 September 2020

काही महिन्यांपासुन शहरासह ग्रामीण भागात मोबाईल नेटवर्कची समस्या भेडसावत आहे.

श्रीरामपूर (अहमदनगर) : काही महिन्यांपासुन शहरासह ग्रामीण भागात मोबाईल नेटवर्कची समस्या भेडसावत आहे. मोबाईल नेटवर्क कंपन्याकडुन ग्राहकांना सुरळीत सुविधा मिळत नसल्याने ग्राहकांतुन संताप व्यक्त होत आहे. कोरोनाच्या संकटात अनेक कंपन्या अडचणीत आल्या असुन उत्तम सेवा पुरविणे अवघड बनले आहे.

सद्या सुरळीत नेट सुविधा मिळत नसल्याचे शेकडो ग्राहकांच्या तोंडून सांगितले जाते. यासंदर्भात ग्राहक प्रतिनिधीकडे तक्रार करुन देखील सुरळीत सेवा मिळत नसल्याने ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागतो. कोरोनाच्या संकटात ऑनलाइन शिक्षणाची संकल्पना पुढे आली. परंतू ग्रामीण भागासह शहरात अनेक ठिकाणी आजही मोबाईल नेटवर्कसाठी अडचणी येतात. मोबाइलचे नेटवर्क अचानक बंद पडते. अनेकदा समोरच्या व्यक्तीचा आवाज स्पष्ट येत नसल्याने संवाद अर्धवट राहतो. एकीकडे फोर-जी तंत्रज्ञाची जोरात चर्चा सुरु असली तरी ग्राहकांसाठी सुरळीत सेवा पुरविणे मोबाईल नेटवर्क कंपन्यासमोर मोठे आव्हान आहे.

ग्रामीण भागात सद्या काॅलवरील समोरच्या व्यक्तीचा स्पष्ट आवाजही येत नसल्याच्या तक्रारी येत आहे. सुरळीत नेटवर्क मिळत नसल्याने नेटचा वापर कमी प्रमाणात होतो. मात्र कंपन्या अनलिमिटेड रिचार्जच्या नावाखाली ग्राहकांची लुट करतात. मोबाईलची संख्या झपाट्याने वाढल्याने नेटवर्क यंत्रणेवरील ताण वाढला. त्यात अनेक ठिकाणचे टाॅवर बंद अवस्थेत आहे. ग्राहक सोईनुसार विविध कंपन्यांची सीमकार्ड वापरतात. परंतू सद्या सर्वच मोबाईल कंपनीच्या ग्राहकांना नेटवर्कच्या समस्यांना तोड द्यावे लागत आहे. मोबाईल नेटवर्कच्या टॉवरची तात्काळ दुरुस्ती करुन पुर्णवेळ ऑपरेटरची नेमणुक करुन ग्राहकांना सुरळीत सेवा देण्याची मागणी नागरीकांतुन होत आहे 

सध्या आयडियाकडून सुरळीत सेवा मिळत नाही. कॉल सुरू असताना अचानक समोरचा आवाज बंद होतो. अनेकदा नेटवर्क उपलब्ध नसल्याने इंटरनेटला गती मिळत नाही. यासंदर्भात तक्रार केल्यानंतरही प्रतिसाद मिळत नाही. कोरोनाच्या संकटात ऑनलाइन शिक्षण सुरु झाले. त्यासाठी सुरळीत नेटवर्कची गरजेचे आहे. परंतू सुरळीत नेटवर्क मिळत नसल्याने ऑनलाइन शिक्षणात अडथळा निर्माण झाला आहे. अनलिमिटेड रिचार्जच्या नावाखावी विविध कंपन्याकडुन ग्राहकांची फसवणुक केली जाते. फोर- जी सोडा प्रत्यक्ष कॉलवरील समोरच्या व्यक्तीचा आवाज देखील स्पष्ट येत नाही. 
- गोपाल सपकार, मोबाईल ग्राहक 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mobile not reachable in Shrirampur taluka