
डॉ. बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या बॉयलरचे तांत्रिक दोष दुरुस्ती करून कारखान्याचा ऊस गळीत हंगाम सुरु झाला.
राहुरी (अहमदनगर) : डॉ. बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या बॉयलरचे तांत्रिक दोष दुरुस्ती करून कारखान्याचा ऊस गळीत हंगाम सुरु झाला. तत्पूर्वी, कारखाना कामगार व व्यवस्थापनातर्फे परिसरातील देव- देवतांना अभिषेक करून, हंगाम निर्विघ्न पार पडण्यासाठी साकडे घालण्यात आले.
तनपुरे साखर कारखान्यात यंदा गव्हाण व मशीनरीत आधुनिकीकरण करून दैनंदिन गाळप क्षमता तीन हजार वरुन ४२५० मॅट्रिक टन करण्यात आली आहे. कारखान्याचे मार्गदर्शक डॉ. सुजय विखे पाटील यांनी ऊस तोडणी यंत्रणा देऊन, ऊस पुरवठ्याचे नियोजन केले आहे. कारखान्याने यावर्षी सहा लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. मागील वर्षी कार्यक्षेत्रात ऊसाच्या टंचाईमुळे कारखान्यांचा हंगाम बंद होता. त्यामुळे, यंदा हंगाम सुरू करताना विविध समस्या उभ्या ठाकल्या. जिल्हा सहकारी बँकेचे कर्ज थकले. बँकेचे ज्येष्ठ संचालक माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या सहकार्याने बँकेचा अडथळा दूर झाला.
यावर्षी हंगाम वेळेत सुरू करण्यासाठी व्यवस्थापनाने आटोकाट प्रयत्न केले. परंतु, हंगामाच्या सुरुवातीला बॉयलर मध्ये तांत्रिक दोष निर्माण झाला. त्यामुळे, हंगाम सुरु होण्यास २० ते २५ दिवस विलंब झाला. दरम्यान, कारखाना कार्यक्षेत्रातून तालुक्याबाहेरील नगर व पुणे जिल्ह्यातील बारा साखर कारखान्यांनी उसाची पळवापळवी सुरू केली. कार्यक्षेत्रात हंगामाच्या सुरुवातीला दहा लाख मॅट्रिक टन ऊस उभा होता. परंतु, दररोज पाच ते सहा हजार टन ऊस तालुक्याबाहेर जात असल्याने, कारखान्याचे गाळप उद्दिष्ट साध्य करतांना ओढाताण होणार आहे. कारखान्यावर कामगार, ऊस तोडणी मजूर, परिसरातले छोटे व्यापारी यांचे हजारो प्रपंच अवलंबून आहेत.
कारखाना कार्यक्षेत्रात अद्याप आठ लाख मेट्रिक टन ऊस उभा आहे. बाहेरच्या कारखान्यांनी ऊस भावाची कोंडी फोडलेली नाही. तालुक्यातील शेतकऱ्यांनी बाहेरच्या कारखान्यांना ऊस देणे बंद केले. तरच कारखान्याचा हंगाम यशस्वी होणार आहे. कारखान्याचा साखर उतारा जिल्ह्यात पहिल्या तीन क्रमांकात राहण्याची परंपरा आहे. त्यामुळे, यावर्षी इतर कारखान्यांच्या तुलनेत उसाला चांगला भाव मिळणे अपेक्षित आहे.
यंदा तांत्रिक दोषामुळे कारखाना सुरू करण्यास विलंब झाला. तरी, कारखान्याचे मार्गदर्शक खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी गाळपाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नियोजन केले आहे. कार्यक्षेत्रातील सभासद शेतकऱ्यांनी तालुक्या बाहेरच्या कारखान्यांच्या ऊस तोडी बंद करून, आपल्या कारखान्याला ऊस देऊन सहकार्य करावे.
- नामदेवराव ढोकणे, अध्यक्ष, तनपुरे साखर कारखाना
संपादन : अशोक मुरुमकर