अण्णांमुळे दिल्लीत सुरू झाली धावपळ, संकट मोचन महाजन पुन्हा राळेगण सिद्धीत

एकनाथ भालेकर 
Thursday, 28 January 2021

हजारे यांच्याशी माजी मंत्री महाजन यांनी सुमारे एक तास चर्चा केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना म्हणाले, स्वामिनाथन आयोगानुसार शेतीमालाला दीडपट  हमीभाव मिळावा ही अण्णांची प्रमुख मागणी आहे.

राळेगणसिद्धी (अहमदनगर) : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. गुरुवारी केंद्रिय कृषीमंत्री नरेंद्र तोमर व राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची नवी दिल्ली येथे बैठक झाली. त्या बैठकीचा वृतांत घेऊन माजी मंत्री गिरीश महाजन गुरुवारी ( दि.२८ ) सकाळी नऊ वाजता दाखल झाले. महाजन यांनी हजारे यांना दिल्लीतील बैठकीतील निर्णयांची माहिती दिली.

स्वामिनाथन आयोगानुसार शेतीमालाला दीड पट हमीभाव मिळावा. दूध, फळे, भाजीपाला यांनाही हमीभाव मिळावा, केंद्रीय कृषीमूल्य आयोगाला निवडणूक आयोगप्रमाणे स्वायत्तता मिळावी, अशा या हजारे यांच्या मागण्यांसाठी (ता.३०) जानेवारीपासून राळेगणसिद्धी येथे उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

हजारे यांच्याशी माजी मंत्री महाजन यांनी सुमारे एक तास चर्चा केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना म्हणाले, स्वामिनाथन आयोगानुसार शेतीमालाला दीडपट  हमीभाव मिळावा ही अण्णांची प्रमुख मागणी आहे. या मागणीसह अन्य मागण्यांची पूर्तता व्हावी, यासाठी केंद्रीय कृषी राज्य मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली उच्चधिकार समिती स्थापन करण्याचा निर्णय बुधवारी दिल्लीत कृषिमंत्री नरेंद्र तोमर व विरोधी पक्षनेते नेते फडणवीस, संबंधित खात्याचे अधिकारी यांच्या बैठकीत झाला आहे. त्याचे प्रारूप आज ठरविण्यात येणार आहे. 

अण्णांच्या मागणीनुसार या समितीत सरकारचे तीन व सिव्हिल सोसायटीचे तीन प्रतिनिधी असणार आहेत. समितीतील सरकारचे सदस्य कोण असतील व अशासकीय सदस्य कोण असतील? याबाबत आज निर्णय घेण्यात येणार आहे. उद्या (२९ ) केंद्रीय कृषी राज्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस राळेगणसिद्धी येथे केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचे लेखी पत्र घेऊन राळेगण सिद्धी येथे हजारे यांची भेट घेण्यासाठी येण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारचे लेखी पत्र घेऊन येणार आहेत. ८३ वर्षांचे वय पाहता अण्णांनी उपोषण करू नये, अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांची इच्छा असल्याचे माजी मंत्री महाजन पत्रकारांशी बोलताना सांगितले.

दिल्लीतील शेतकरी आंदोलनातील हिंसक प्रकार निंदनीय आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी असलेल्या आंदोलनात असे अनुचित प्रकार होणे निषेधार्थ आहे.
- माजी मंत्री गिरीश महाजन


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The modi government is scared after anna hazare warning