esakal | मराठा आरक्षणासाठी अकोलेत मराठा समाजाचा मोर्चा
sakal

बोलून बातमी शोधा

Morcha of Maratha community in Akole for Maratha reservation

आरक्षण मिळावे यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने अकोले शहरातून मोर्चा काढण्यात आला. महात्मा फुले चौकातून या मोर्चास सुरुवात झाली.

मराठा आरक्षणासाठी अकोलेत मराठा समाजाचा मोर्चा

sakal_logo
By
शांताराम काळे

अकोले (अहमदनगर) : आरक्षण मिळावे यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने अकोले शहरातून मोर्चा काढण्यात आला. महात्मा फुले चौकातून या मोर्चास सुरुवात झाली. त्यानंतर छत्रपती शिवाजी चौकात जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून घोषणाबाजी करत सुरुवात झाली. 

‘सकल मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे’, ‘आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाचे बापाचे’ आदी घोषणा देत परिसर दणाणून गेला होता. मोर्चेकऱ्यांनी जोरदार घोषणा देत शहरातील मुख्य रस्त्यावरून पोलिस ठाणे गाठले. त्या ठिकाणी पोलिसांनी गेट बंद केले. यावेळी मोर्चेकऱ्यांनी गेटच्या बाहेरच ठिय्या दिला अन्‌ भाषणे सुरू केली.

आम्हाला आमच्या हक्काचे आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी जोरदार मागणी यावेळी महेश नवले, डॉ. संदीप कडलग, मच्छिंद्र धुमाळ, सुरेश खांडगे, दादा पाटील वाकचौरे, सोमनाथ नवले, विनोद हांडे, सुरेश नवले, स्वाती शेणकर, सुरेश गडाख, लालूशेठ दळवी, संजय वाकचौरे, प्रा. शेणकर, अक्षय बोंबले, दत्ता नवले, राजेंद्र कुमकर, अक्षय देशमुख, स्वप्नील शिर्के आदींनी आपल्या भाषणातून केली. सूत्रसंचालन सुरेश नवले यांनी तर सचिन नरोडे यांनी आभार मानले. 

दरम्यान या मागणीचे निवेदन तहसिलदार मुकेश कांबळे यांना देण्यात आले. दरम्यान मोर्चावेळी कायदा व सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिस निरिक्षक अरविंद जोंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

संपादन : अशोक मुरुमकर

loading image