पारनेरमध्ये सर्वाधिक दुषित जलसाठे, जामखेडला एकही नाही

दौलत झावरे
Monday, 7 December 2020

पारनेर तालुक्‍यात सर्वाधिक दूषित, तर जामखेड तालुक्‍यात पाण्याचा एकही नमुना दूषित आढळला नाही. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून नियमित पाणीनमुने तपासले जातात.

नगर ः जिल्ह्यातील 14 तालुक्‍यांतील पाण्याचे 1778 नमुने नोव्हेंबरमध्ये तपासले असता, त्यात 59 गावांतील 76 नमुने दूषित आढळले.

पारनेर तालुक्‍यात सर्वाधिक दूषित, तर जामखेड तालुक्‍यात पाण्याचा एकही नमुना दूषित आढळला नाही. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून नियमित पाणीनमुने तपासले जातात. दूषित नमुने आढळल्यास संबंधित ग्रामपंचायतींना सूचना केल्या जातात.

जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा व भूजल विभागाकडून दरमहा तपासल्या जाणाऱ्या दूषित पाण्याच्या नमुन्यांची संख्या वाढत आहे. नोव्हेंबरमध्ये तपासलेल्या 1778 पैकी 76 नमुने दूषित आढळले.

या महिन्यात दूषित पाण्याची टक्केवारी 4.27 झाली आहे. पारनेरमधील 12 गावांतील 16 नमुने दूषित आढळले. त्याखालोखाल पाथर्डीतील 13 गावांतील 14 नमुने दूषित आढळून आले. 

जिल्ह्यातील पाण्याचे 11 हजार 950 नमुने एक एप्रिल ते नोव्हेंबरअखेर तपासण्यात आले असून, त्यात 651 दूषित नमुने आढळले आहेत. त्याची टक्केवारी 5.45 आहे. 

दूषित पाणीपुरवठा होणारी गावे 
नगर ः कामगारगाव, भोरवाडी. अकोले ः कोतुळ, पांगरी, पिंपळगाव खांड, बोरी. कर्जत ः वालवड, सुपे. कोपरगाव ः संवत्सर, धारगाव. नेवासे ः निपाणी वडगाव, माळीचिंचोरे, रांजणगाव, उस्थळ दुमाला. पारनेर ः निघोज, राळेगण थेरपाळ, हकीगतपूर, लोणी हवेली, हतलखिंडी, पुणेवाडी, पारनेर, वडनेर हवेली, कान्हूर पठार, वडगाव दर्या, पिंपरी जठार, काकणेवाडी. पाथर्डी ः जिरेवाडी, ढांगेवाडी, क्षीरसाठवाडी, पिंपळगाव, करोडी, भालगाव, घाटशिरस, जवखेडे खालसा, निंबेदैत्य नांदूर, मिडसांगवी, डमाळवाडी, मोहोज बुद्रुक, शंकरवाडी. शेवगाव ः दहिफळ जुने, भायगाव, भावी निमगाव, एरंडगाव समसुद, खरडगाव, सुलतानपूर खुर्द, अमरापूर, देवटाकळी. राहाता ः नांदुर्खी बुद्रुक, अस्तगाव, पिंपळस, रामपूरवाडी. राहुरी ः करजगाव, जातप, माहेगाव. संगमनेर ः गुंजाळवाडी, वेल्हे. श्रीगोंदे ः घारगाव. श्रीरामपूर ः हरेगाव, भोकर. 

तालुकानिहाय तपासलेले व कंसात दूषित नमुने 
नगर ः 84 (पाच), अकोले ः 111 (सहा), कर्जत ः 22 (दोन), कोपरगाव ः 88 (दोन), नेवासे ः 250 (सहा), पारनेर ः 154 (16), पाथर्डी ः 279 (14), शेवगाव ः 109 (आठ), राहाता ः 151 (चार), राहुरी ः 111 (तीन), संगमनेर ः 146 (पाच), श्रीगोंदे ः 156, (एक), श्रीरामपूर ः 92 ः (तीन). 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The most polluted reservoir in Parner, Jamkhed has none