'सातबारा स्वाक्षरीसह संगणिकरण' नेवासे जिल्ह्यात प्रथम; तहसीलदार रुपेश सुराणा यांची कामगिरी

सुनील गर्जे  
Friday, 25 September 2020

शेतकऱ्यांना विविध कामांसाठी अतिशय उपयुक्त असलेल्या ७७ हजार ७५५ पैकी ७७ हजार ७१९ गटाचे तांत्रिक चुका दुरुस्तीसह ऑनलाईन संगणकीकरण करण्यात आले आहे. २१ गावात ९९.९९ टक्के सातबारा स्वाक्षरीसह डिजिटल झाल्या आहेत.

नेवासे (अहमदनगर) : शेतकऱ्यांना विविध कामांसाठी अतिशय उपयुक्त असलेल्या ७७ हजार ७५५ पैकी ७७ हजार ७१९ गटाचे तांत्रिक चुका दुरुस्तीसह ऑनलाईन संगणकीकरण करण्यात आले आहे. २१ गावात ९९.९९ टक्के सातबारा स्वाक्षरीसह डिजिटल झाल्या आहेत.

विशेष म्हणजे १०६ गावात शंभर टक्के काम पूर्ण झाले असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हस्तलिखित सातबाराची साडेसाती संपली असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. नगर जिल्ह्याचा विचार केल्यास तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्या नेतृत्वाखाली सातबारा स्वाक्षरीसह संगणिकर करण्यात नेवासे तालुक्याचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक आहे.

तालुक्याचे भौगोलिक क्षेत्रफळ मोठे आहे. परंतु, महसूल यत्रंणा अल्प असल्याने शेतक-यांची हस्तलिखित अशी सातबारा तलाठ्याकडे जाऊन ते काढताना दमछाक होत होती. संगणकाचे युग आले य महत्वाचा असा दस्तऐवज ऑनलाईन स्वाक्षरीसह डिजिटल करण्याचे काम हाती घेण्यात आले. तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांचे योग्य नियोजन व मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार डी. एम. भावले, कामगार तलाठी विजय जाधव आदींनी हे काम पूर्ण करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.

तालुक्यातील १०६ गावातील सर्वच अशा गटाचे काम शंभर टक्के करण्यात यश आले आहे. त्यात ७७ हजार ७१९ गटांचा समावेश आहे. तालुक्यातील उर्वरित गावांतील गटाचे डिजिटल काम  ३६ गट म्हणजे गावाच्या एकूण सातबाराच्या एक टक्का असे मोजकेच शिल्लक आहे. त्यात गावे एकूण ७७ हजार ७५५ सातबारा संख्या पैकी ३६ सातबारा ह्या २१ गावांतील गटाचे काम शिल्लक आहे. 

सातबारा हा पीक विमा भरणा, कृषी सलंग्न योजना, कर्ज उचलण्यासाठी, कायदेशीर कामासाठी उपयुक्त असतो. पीक विम्याला संलम्नित करण्यात आले आहे. त्यामुळे खाते क्रमांक टाकला की सातबारा माहिती दिसणार आहे. पूर्वी गावाचा कोड नव्हता आता येत आहे.

कोरोनामुळे ३६ गटांचे काम प्रलंबित
प्रलंबित तालुक्यातील २१ गावांतील एकूण ३६ गटांचे काम प्रलंबित असल्याचे समोर आले आहे. हे प्रमाण अत्यल्प असले तरी क्षेत्र जुळत नसल्याने काम रखडले आहे. त्यासाठी खातेदाराची सुनावणी घेऊन डिजिटल सातबारा करावा लागणार आहे. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरु व फिजिकल डिस्टन्सिंग राखावे लागत आहे. दरम्यान, डिजिटल सातबारावर काही नवीन तांत्रिक दुरुस्ती, फेरफार प्रलंबित असेल तर दर्शवित आहे. कुणाच्या नावाची जमीन कमी झाली असेल तर आडवी रेषा येत आहे.

महसुलच्या टीमचे यश : रुपेश सुराणा
"सातबारा स्वाक्षरीसह संगणिकरणाचे ९९.९९ टक्के काम पूर्ण झाले. एक टक्क्यात काही तांत्रिक अडचणी आहेत. त्याही लवकरच सोडवू. या कामात नगर जिल्ह्यात नेवाशाचा प्रथम क्रमांक आहे.  हे सर्व  यश आमच्या महसूल टीमचे आहे असे  तहसीलदार रुपेशकुमार सुराणा म्हणाले.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Most of the work of Satbara Utara of Nevasa taluka in Nagar district