भाजी- भाकरीची शिदोरी शेतात ठेवली, मुलगी विहरीवर पाणी आणायला गेली

राजेंद्र सावंत
Wednesday, 21 October 2020

मुंगुसवाडे येथे शेतामधे कापुस वेचायला गेलेल्या मायलेकीचा विहरीत पडुन मृत्यु झाला. बुधवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही घटना येथे शेतामधे घडली.

पाथर्डी (अहमदनगर) : मुंगुसवाडे येथे शेतामधे कापुस वेचायला गेलेल्या मायलेकीचा विहरीत पडुन मृत्यु झाला. बुधवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही घटना येथे शेतामधे घडली. शेजारी कापुस वेचणाऱ्या महीलांना ही घटना समजताच त्यांनी आरडाओरड केला. मात्र तोपर्यंत सुनिता नारायण हिंगे (वय 42) व प्रतिक्षा नारायण हिंगे (वय14) यांचा मृत्यु झाला. 

सुनिता हिंगे मुलगी प्रतिक्षासह सकाळी शेतमाधे कापुस वेचणीला गेल्या होत्या. भाजी- भाकरीची शिदोरी शेतात ठेवुन मुलगी प्रतिक्षा विहरीवर पाणी आणण्यासाठी गेली. विहीरीचे बांधकाम केलेले नसल्याने पाणी घेताना पाय घसरुन प्रतिक्षा पाण्यात पडली. बराच वेळ झाला मुलगी येईना म्हणुन आई सुनिता विहरीवर गेली तेव्हा मुलगी विहरीत पडल्याचे तिला समजले घाबरलेल्या सुनिताही तोल गेला आणि ती विहरीत पडली. तोंडात पाणी गेल्याने सुनिताला ओरडता आले नाही. 

शेजारी कापुस वेचणाऱ्या महिलांनी सुनिताला आवाज दिला. पण काहीच प्रतिसाद मिळाला नाही. तेव्हा महिला विहरीवर आल्या. त्यांनी आरडाओरडा केला. माणस धावली पण सुनिता व प्रतिक्षा पाण्यात बुडालेल्या होत्या. शेतात काम करणा-या मायलेकीचा विहरीत पडुन झालेला मृत्यु म्हणजे नारायण हिंगे या अल्पभुधारक शेतक-यांचा संसार उद्धवस्त करणारी व ह्रदय पिलवटुन टाकणारी घटना.

गावकरी हळहळत होते.मायलेकीची मृतदेह पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविले आहेत. घटनेची माहीती मिळताच पोलिस निरीक्षक रमेश रत्नपारखी व हवालदार सुरेश बाबर सहका-यासह घटनास्थळी पोहचले. विहरीतुन मृतदेह बाहेर काढण्यात आले. पोलिसांनी अकस्मात मृत्युंची नोंद केली आहे. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mother and daughter die after falling into well in Munguswade Pathardi