esakal | आई का गेली सगळे पाश तोडून, मुलांना जंगलात सोडून!
sakal

बोलून बातमी शोधा

The mother left the children in the forest

मुलांची आई अकोले पोलिसांनी शोधून आणली नाही तर महिलांचा मोर्चा अकोले पोलिस स्टेशनवर काढणार असल्याचे त्या म्हणतात. 

आई का गेली सगळे पाश तोडून, मुलांना जंगलात सोडून!

sakal_logo
By
शांताराम काळे

अकोले : कोणाच्या वाट्याला कसले भोग येतील, हे सांगता येणार नाही. आपण सुखी तर जग सुखी असं तत्त्वज्ञान घेऊन जगणारं माणसं आहेत. त्यांना आपल्या सुखापुढे कोणाच्याच सुखाचं घेणं देणं नसतं, अगदी पोटच्या गोळ्याचंही. ही केविलवाणी मुलं तुम्ही पाहत असाल, तर त्यांच्या चेहऱ्यावरचा भाव पहा. किंवा डोळे पाहता आले तर त्यातही डोकवा. न सांगताही त्यांची स्टोरी उलगडत जाईल.

तर ते असं आहे ः अकोले तालुक्यातील कळंब नावाचं गाव आहे. तेथून दीड किलोमीटर अंतरावर परतंनदरावाडी आहे. अगदी जंगली एरिया. बिबटे, तरस, लांडगे असे हिस्त्र प्राण्यांची भरमार आहे. त्याच जंगलात एक झोपडी आहे. तिथे नंदिनी (वय ७) व तिचा भाऊ सिद्धांत (वय ५) एकटेच राहतात. जंगलातील या झोपडीला साबराचे नैसर्गिक कंपाऊंड आहे. प्लॅस्टिकचा कागद अंथरून झोपडी केलीय.

आई-बापाचा विषय म्हणाल तर तीही एक लंबी-चौडी कहानी आहे. त्यांची आई तीन वर्षांपूर्वीच या बाळांना सोडून गेली. बायको गेल्याची तक्रार तिचा नवरा ज्ञानेश्वरने पोलिसांत दिली. तिचा आणि त्याचा ठावठिकाणाही सांगितला पण पोलिसांनी घरगुती मॅटर म्हणून काहीच केलं नाही. 

कळंब येथील जंगलात पोरांना त्यांचा बाप राहतो आहे. तो सकाळी उठल्यावर मजुरीच्या कामासाठी बाहेर गावी जातो तर त्याची दोन मुले झोपडीत रोज जीव मुठीत धरून असतात. दोन भाकड जनावरे व कोंबड्यांची नंदिनी व सिद्धांतला साथ असते. बाप कधी येईल, याची जीव मुठीत धरून वाट पाहत असता. नंदिनी दुसरीत शिकते. मात्र, कोरोना असल्याने शाळा बंद आहे. नाही तर दोन किलोमीटर पायी चालत तिला शाळेत जावे लागते. 

वडील ज्ञानदेव गवंडी काम करतात. त्यांना सकाळी उठून भाकरी कराव्या लागतात. सिद्धांतला अंघोळ घालून जेवण देणे, जनावरांना चारा घालणे सर्व काम ती करते. आपला बाप रोज घरी येतो. एकेदिवशी आईही येईल, असं त्या चिमुरड्यांना वाटतं. कळंब गावच्या उपसरपंच शकुंतला खरात यांनाही या गोष्टीचं दुःख आहे. 
मुलांची आई अकोले पोलिसांनी शोधून आणली नाही तर महिलांचा मोर्चा अकोले पोलिस स्टेशनवर काढणार असल्याचे त्या म्हणतात. 

जंगलातील प्राण्यांची भीती
दोन दिवसांपूर्वी सायंकाळी सात वाजता झोपडीच्या समोर चार कोल्हे व तरस यांची भांडणे सुरू होती. मुले घाबरून झोपडीत दडून बसली. तासाभराने वडील आल्यावर त्यांच्या जीवात जीव आला. त्यांनी पोरांना छातीला कवटाळून आपल्या भावना व्यक्त केल्या.

संपादन - अशोक निंबाळकर

loading image