संजय राऊत यांना सर्वच कळत असेल तर त्यांनी राज्य कोरोनामुक्त करुन दाखवावे

प्रा. रवींद्र काकडे
Wednesday, 19 August 2020

जिव धोक्यात घालून कोरोना संकटात सेवा देणाऱ्या डॉक्टरांच्या संदर्भात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेले विधान अतिशय अक्षेपार्ह आहे.

लोणी (अहमदनगर) : जिव धोक्यात घालून कोरोना संकटात सेवा देणाऱ्या डॉक्टरांच्या संदर्भात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेले विधान अतिशय अक्षेपार्ह आहे. याबद्दल त्यांनी देशातील डॉक्टरांची माफीच मागितली पाहीजे, अशी मागणी भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केली. इतरांना काही कळत नाही आणि यांनाच सर्व कळत असेल तर राज्यातील कोरोना त्यांनी घालवून दाखवावा असा खोचक सल्लाही त्यांनी दिला.

लोणी बुद्रूक येथे दूध उत्पादकांच्या मागण्यांबाबत महादूध आंदोलनात खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी सहभाग घेवून मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविले. त्या‍नंतर माध्यमांशी बोलताना खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावर निशाणा साधला. माझ्यासह देशातील प्रत्येक डॉक्टर कोरोनाच्या या संकटात स्वत:चा जीव धोक्यात घालून रुग्णांना सेवा देत आहे. त्यात डॉक्टरांबद्दलच अशा पध्दतीने विधान केलेल्या विधानाचा त्यांनी तिव्र शब्दात निषेध केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी नेतृत्वाखाली केंद्र सरकारनेच सर्व काही करावे, अशी अपेक्षा असेल तर स्वत:च्या स्वार्थाकरीता जनतेने नाकारल्यानंतरही तीन पक्षांनी एकत्रित येवून स्थापन केलेल्या महाविकास आघाडी सरकारला जनतेला न्याय देवून आमच्या मागण्या मान्य कराव्या लागतील. राज्‍यातील महाविकास आघाडी सरकार केवळ केंद्र सरकारकडे बोट दाखवून आपली जबाबदारी टाळणार असेल तर त्यांनी सत्तेत पायउतार होवून भाजपाकडे राज्य सुपूर्त करावे, असे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी सुचित केले.

ज्यांचे जिल्हे लॉकडाऊन आहेत असे पालकमंत्री, आरोग्यमंत्री नगर जिल्ह्यात येऊन जिल्हा लॉकडाऊन होणार नाही, असे जाहीर वक्तव्य करतात. नगर जिल्ह्याला वेठीस धरण्याचा प्रकार असून, जिल्ह्यात रॅपीड अॅन्टीजेन टेस्ट होत असल्या तरी आर्टीफीशीएल टेस्ट केली जात नाही. यावर आमचा आक्षेप कायम असून, नगर जिल्ह्यात झालेल्या मृत्युसंख्येबाबत आपण सविस्तर अहवाल तयार करुन लवकरच यावर भाष्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Sujay Vikhe Patil criticized Sanjay Raut statement