कर्जतमधील गाळेधारकाच्या डोक्यावरची टांगती तलावर कायमची दूर होणार

निलेश दीवटे
Wednesday, 26 August 2020

कर्जत शहरातील मुख्य रस्त्यावरील दुतर्फा असणार्‍या गाळेधारकांना रस्ता रुंदीकरणामध्ये विस्थापित होण्याची वेळ आली आहे.

कर्जत (अहमदनगर) : शहरातील मुख्य रस्त्यावरील दुतर्फा असणार्‍या गाळेधारकांना रस्ता रुंदीकरणामध्ये विस्थापित होण्याची वेळ आली आहे.

५० वर्षांपासून येथे व्यवसाय करुन उदरनिर्वाह करणार्‍यांच्या रोजीरोटी जाऊ नये, यासाठी बाह्यवळण रस्त्याचा पर्याय सुचवण्यात आला आहे. खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी नुकतेच सार्वजनिक बांधकाम विभागाला पर्यायी बाह्यवळण  रस्त्याचे सर्वेक्षण व आखणी करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार रस्त्याचे सर्वेक्षण सुरू होणार आहे.

त्यामुळे गाळेधारकांच्या डोक्यावरची टांगती तलवार कायमची दूर होईल. याबाबत सर्व गाळे धारकांची उपनगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी भेट घेत त्यांना या प्रश्नी लक्ष घालण्याचे साकडे घातले होते. यावेळी सर्वांनी एकजुटीने लढा उभारू. मी खंबीरपणे तुमच्या पाठीशी आहे, असे आश्वासन दिले होते. आज या सर्वांनी खासदार डॉ सुजय विखे पाटील यांची भेट घेतली आहे.

नगरपंचायत हद्दीतील अक्काबाई नगर ते दादा पाटील महाविद्यालयपर्यंतचा रस्त्याच्या बाजूला गाळेधारक सुमारे ५० वर्षापासून व्यवसाय करीत आहेत. 1996- 97  या रस्ता रुंदीकरण करतेवेळी एसटीबस स्थानकाच्या संरक्षण भिंती लगत असणाऱ्या दुकानाची रांग तत्कालीन मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून जैसे थे ठेवण्यात आली होती. 

आजपर्यंत या अल्प उत्पन्न गाळे धारकांची उपजीविका सुरू असून गाळे जमीनदोस्त झाले तर सुमारे तीनशेपेक्षा जास्त गाळेधारक व त्यांचे कुटुंबीय रस्त्यावर येतील. या सर्व बाबी लक्षात घेऊन खासदार डॉ सुजय विखे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला बाह्य वळणं रस्ताचे प्रस्ताव तयार करण्यासाठी सूचना केली आहे.

बाह्यवळण रस्ता बाबतची प्राथमिक माहिती हाती आली असून गायकरवाडी, जामदारवाडा ते खंडाळा असे सुमारे ४३ किलोमीटरचा बाह्यवळण रस्ता प्रस्तावित करण्यात आला आहे. कर्जत शहरातील विस्थापित होणाऱ्या गाळेधारकांच्या त्यामुळे जीवात जीव येणार आहे. 

सुमारे २० वर्षापूर्वी तत्कालीन मंत्री असताना आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी गाळेधारकांना विस्थापित करण्यापासून प्रशासनाला रोखले होते. त्यानंतर आज खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढताना प्रस्तावित ४३ किलोमीटरच्या बाह्यवळण रस्त्यासाठी पाठपुरावा केला आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Sujay Vikhe will leave the issue of vendors in Karjat