उर्जा मंत्र्यांच्या आदेशाला महावितरणने ठेवले कपाटात

संजय आ. काटे
Monday, 1 February 2021

श्रीगोंद्यातील वीज प्रश्नांबाबतच्या समस्या व वसुली याबाबत शुक्रवारी आढावा बैठक लावल्याचेही तनपुरे यांनी स्पष्ट केले होते. 

श्रीगोंदे : कृषीपंपाची थकबाकी वसुल करण्यासाठी शेतकऱ्यांची वीज तोडू नका, अगोदर सरकारची धोरणे शेतकऱ्यांना सांगण्यासाठी गावात जा असा आदेश देणाऱ्या उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गांभार्याने घेतले नाही.

उलट आता सोशल मीडियात पोस्ट टाकून वीज पुरवठा खंडीत करण्याचे धाडस महावितरणचे कर्मचारी करीत असल्याने तनपुरे यांच्या आदेशाला महावितरणने केराची टोपली दाखविल्याचा प्रकार समोर आला आहे. 

उर्जा राज्यमंत्री तनपुरे श्रीगोंद्याच्या दौऱ्यावर आले असता राष्ट्रवादीचे नेते घनशाम शेलार यांना शेतकऱ्यांनी मंत्र्यांनी वीज वसुलीबाबत लक्ष घालण्याची मागणी केली होती. त्यावर शेलार यांनी मंत्र्यांना थेट महावितरणच्या कार्यालयात नेले. मात्र, तेथे अधिकारीच नसल्याने सावळा गोंधळ समोर आला होता.

महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क करीत तनपुरे यांनी शेतकऱ्यांना वीजेची बीलेच मिळत नाहीत, याबाबत सरकारने जी धोरणे घेतली आहेत, ती शेतकऱ्यांना सांगून त्यावर अंमलबजावणी करा आणि मगच वसुलीबाबत वेगळा निर्णय घ्या, तोपर्यंत कुणाचाही वीज पुरवठा खंडीत करु नका असे स्पष्ट आदेश दिले होते.

श्रीगोंद्यातील वीज प्रश्नांबाबतच्या समस्या व वसुली याबाबत शुक्रवारी आढावा बैठक लावल्याचेही तनपुरे यांनी स्पष्ट केले होते. 

मात्र तनपुरे श्रीगोंद्यात निघून गेले आणि महावितरणने पुन्हा एकदा कृषीपंप वसुलीसाठी मागचे पाढे पच्चावन्न असे दाखवित वीज पुरवठा खंडीत करण्याचे धाडस केले.

आता तर सोशल मिडीयात पोस्ट टाकुन थकबाकीदार शेतकऱ्यांनी किमान पाच हजार रुपये भरा तर वीज सुरु होईल, आठ तासापैकी एकच तास शेतीची वीज येईल इतर सात तास बंद राहिल असे बजावण्याचे धाडस केले जात आहे.

या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी अधिकारी असल्याचे बोलले जाते. त्यामुळे तनपुरे यांच्या जिल्ह्यातच त्यांच्या आदेशाचा कुठलीही किंमत नसल्याचे समोर आल्याचे बोलले जाते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MSEDCL kept the order of the energy minister in the cupboard