मुकुंदनगरला फेज टूने आणला फेस, आठ वर्षांपूर्वी टाकी बांधूनही पाणी नाही

अमित आवारी
Friday, 11 December 2020

आमदार संग्राम जगताप महापौर असताना काम पूर्ण झाले. मात्र, अद्यापि टाकीत पाणी आलेले नाही. "फेज-दोन' योजनेचे पाणी मुकुंदनगरच्या या टाकीत पडणार आहे.

नगर ः शहरातील मुकुंदनगर भागातील पाणीप्रश्‍न सोडविण्यासाठी महापालिकेने आठ वर्षांपूर्वी 15 लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बांधली. मात्र, सध्या ती धूळ खात पडून आहे. पाणीप्रश्‍न सुटण्यासाठी "फेज-दोन' योजना कार्यान्वित होण्याची प्रतीक्षा मुकुंदनगरमधील नागरिकांना आहे. 

फकीरवाडा- दर्गादायरा ग्रामपंचायत 2003मध्ये महापालिकेत समाविष्ट करण्यात आली. तेथे जलवाहिन्यांचे जाळे नव्हते. या भागात 40 हजार नागरिक राहतात. हा भाग महापालिकेत आला, तरी मुकुंदनगर विकासापासून वंचित राहू लागले. जलवाहिन्या टाकण्यात आल्या; मात्र वाढते शहरीकरण पाहता, त्या अपुऱ्या असल्याने पाण्याचा प्रश्‍न गंभीर झाला. तत्कालीन महापौर संदीप कोतकर यांनी पाण्याची टाकी उभारण्याचा प्रस्ताव मंजूर केला.

आमदार संग्राम जगताप महापौर असताना काम पूर्ण झाले. मात्र, अद्यापि टाकीत पाणी आलेले नाही. "फेज-दोन' योजनेचे पाणी मुकुंदनगरच्या या टाकीत पडणार आहे. "फेज-दोन'च्या जलवाहिनीचे काम मुकुंदनगरमध्ये 95 टक्‍के पूर्ण झाले आहे. मात्र, शहरात "फेज-दोन'ची जलवाहिनीही कार्यान्वित होणे आवश्‍यक आहे. शेतकरी व महापालिका प्रशासनाच्या वादात हे काम अडकले आहे. 

मुकुंदनगरमध्ये महापालिकेने टाकलेल्या जलवाहिन्यांतून पाण्याच्या नव्या टाकीपर्यंतच्या परिसरातील नागरिकांना दिवसाआड पाणीपुरवठा होतो, तर पाण्याच्या नव्या टाकीपासून दर्गादायऱ्यापर्यंत दोन-तीन दिवसांनी पाणीपुरवठा होतो. महापालिकेच्या जलवाहिनीत तांत्रिक बिघाड निर्माण झाल्यास, या भागात काही दिवस निर्जळी असते. टाकीवर लाखो रुपये खर्च करूनही काही वेळा या भागात पाणी देण्यासाठी टॅंकरवर खर्च करावा लागत आहे. 

 

महापालिका व लोकप्रतिनिधींनी समन्वय साधून फेज-2 योजना तातडीने कार्यान्वित करावी. 
- वहाब सय्यद, नागरिक. 

"फेज-दोन' योजना अंतिम टप्प्यात आहे. दोन ते तीन महिन्यांत ती कार्यान्वित होईल. त्यासाठी महापालिका प्रशासन प्रयत्नरत आहे. 
- रोहिदास सातपुते, पाणीपुरवठा विभागप्रमुख, अहमदनगर महापालिका 

महापालिकेतील अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून मुकुंदनगरमधील "फेज-दोन'च्या जलवाहिनीचे काम अंतिम टप्प्यात आहे. आता प्रतीक्षा फक्‍त शहरातील "फेज-दोन'चे काम पूर्ण होण्याची आहे. 
- आसिफ सुलतान, नगरसेवक 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mukundnagar does not get the benefit of phase two water scheme