मुळाच्या आवर्तनाचे उद्या होणार नियोजन

विलास कुलकर्णी
Wednesday, 23 December 2020

जिल्ह्यातील सर्वात मोठ्या 26 हजार दशलक्ष घनफूट क्षमतेच्या मुळा धरणात सकाळी 25 हजार 857 दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे. यंदा धरणाच्या लाभक्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने खरीप हंगामात आवर्तानाची गरज पडली नाही.

राहुरी : दक्षिण नगर जिल्ह्याची जीवनदायी ठरलेले मुळा धरण तुडुंब भरले आहे. धरणातून शेती सिंचनासाठी आवर्तन सोडावे. अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. उद्या (गुरुवारी) पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली कालवा सल्लागार समितीची बैठक होणार आहे. या बैठकीत धरणातील पाणी वापराचे नियोजन होऊन, रब्बी हंगामातील पहिल्या आवर्तनाच्या तारखेवर शिक्कामोर्तब होईल. त्यामुळे, या बैठकीकडे शेतकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.

जिल्ह्यातील सर्वात मोठ्या 26 हजार दशलक्ष घनफूट क्षमतेच्या मुळा धरणात सकाळी 25 हजार 857 दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे. यंदा धरणाच्या लाभक्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने खरीप हंगामात आवर्तानाची गरज पडली नाही.

आता रब्बी हंगामासाठी मुळा पाटबंधारेच्या अमरापुर उपविभागातील शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील तसेच नेवासा उपविभागातील शेतकऱ्यांनी सिंचनाचे आवर्तन सोडण्याची मागणी केली आहे. उद्या गुरुवारी दुपारी बारा वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुळा व भंडारदरा धरणाच्या कालवा सल्लागार समितीची बैठक पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहेत.

तीन आवर्तनांचे नियोजन
मुळा धरणात पिण्याचे व औद्योगिक वापराचे आरक्षित पाणी तसेच बाष्पीभवन व अचल (मृत) साठा वगळता 14 हजार 500 दशलक्ष घनफूट सिंचनासाठी पाणी उपलब्ध आहे. धरणाच्या उजव्या व डाव्या कालव्याद्वारे रब्बी हंगामात एक व उन्हाळी हंगामात दोन आवर्तनांचे नियोजन जलसंपदा विभागाने केले आहे. पाच जानेवारी ते 15 फेब्रुवारी, एक मार्च ते 15 एप्रिल, एक मे ते 15 जून दरम्यान अवर्तनांच्या नियोजनावर कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत चर्चा होणार आहे.

उजव्या कालव्याचे आवर्तन 40 ते 45 दिवस चालेल. राहुरी, नेवासा, पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील 30 हजार हेक्टर क्षेत्राचे सिंचन होईल. उजव्या कालव्यातून रब्बीसाठी चार हजार दशलक्ष घनफूट व उन्हाळी दोन आवर्तनांसाठी नऊ हजार दशलक्ष कानपूर पाणी खर्च होईल.

डाव्या कालव्याचे आवर्तन 20 ते 25 दिवसांचे राहील. राहुरी तालुक्यातील तीन हजार हेक्टर क्षेत्राचे सिंचन होईल. डाव्या कालव्यातून रब्बीसाठी 500 दशलक्ष घनफूट व उन्हाळी दोन आवर्तनांसाठी एक हजार दशलक्ष घनफूट पाणी खर्च होईल.

अहमदनगर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Mula dam cycle is scheduled for tomorrow