सावधान ! मुळा धरणाचे सर्व दरवाजे उघडले, नदीला मोठा पूर

विलास कुलकर्णी
Friday, 18 September 2020

मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याने, काल (गुरुवारी) रात्री साडेआठ वाजता धरणाचे सर्व अकरा दरवाजे प्रत्येकी २२ इंच उघडण्यात आले आहे.

राहुरी (नगर) : मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याने, काल (गुरुवारी) रात्री साडेआठ वाजता धरणाचे सर्व अकरा दरवाजे प्रत्येकी २२ इंच उघडण्यात आले आहे. धरणातून मुळा नदीपात्रात वीस हजार क्युसेकने विसर्ग सोडण्यात आला. रात्रभर प्रत्येक तासाला धरणाची पाणी पातळी तपासून, मध्यरात्री साडेबारा वाजता विसर्ग तीस हजार झाला आहे. आज (शुक्रवारी) पहाटे चार वाजता पुन्हा वीस हजार क्युसेकने करण्यात आला. मुळा नदीला मोठा पूर आला असून, जायकवाडी धरणात वेगाने पाणी जात आहे. नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

मुळा धरणाच्या पाणलोटात हरिश्चंद्रगडावर पाऊस नाही. लहित खुर्द (कोतुळ) येथे मुळा नदीपात्रात अवघे ५८५ क्युसेकने धरणात नवीन पाण्याची आवक सुरू आहे. हे ठिकाण धरणापासून ११० किलोमीटर अंतरावर आहे. त्यापुढे, नदीपात्रात पाणी मोजण्याची कोणतीही व्यवस्था नाही. या पाणलोटात संगमनेर, पारनेर, राहुरी तालुक्यात मागील दोन दिवसांपासून पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे, धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे.
 
धरणाची पाणी पातळी १८०० फुट झाल्यावर धरण पूर्ण क्षमतेने २६ हजार दशलक्ष घनफूट भरते. सप्टेंबर महिनाअखेर धरणाची पाणी पातळी १८११.५ फुट, धरणसाठा २५,४४४ (९७.८६ टक्के) स्थिर ठेवून, नवीन येणारे सर्व पाणी नदीपात्रात सोडले जात आहे. मुळा पाटबंधारेच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील, धरण शाखाधिकारी अण्णासाहेब आंधळे धरणावरील पूरनियंत्रण कक्षात चोवीस तास पाणी पातळीवर लक्ष ठेवून आहेत. प्रत्येक तासाला धरणाची पाणी पातळी तपासली जात आहे.

मागील २४ तासात धरणावर ५८ मिलिमीटर पाऊस झाला आहे. तर, धरणात १०६९ दशलक्ष घनफूट नवीन पाणी जमा झाले. यावर्षीच्या पावसाळ्यात एक जून पासून काल (गुरुवार) अखेर २४,४९४ दशलक्ष घनफूट नवीन पाणी धरणात दाखल झाले.

धरणावर अंधार...!

काल रात्री धरणावरील वीजपुरवठा खंडित झाला आहे. धरणाची पाणीपातळी झपाट्याने वाढत होती. धरणावर अंधाराचे साम्राज्य पसरले होते. पूरनियंत्रण कक्षात जनरेटर सुरू करण्यात आले आहे. परंतु, पाणी पातळी मोजण्याचे ठिकाणी काळ्याकुट्ट अंधारात बॅटरीच्या उजेडात प्रत्येक तासाला जलसंपदाचे कर्मचारी रात्रभर पाणीपातळी मोजत होते. पहाटे तीन वाजता वीजपुरवठा सुरळीत झाला. रात्रभर अंधारात जलसंपदाच्या कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू होती.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Mula river at Rahuri has been flooded. So all the gates of the Mula dam are open