महापालिकेचे कम्युनिटी किचन बंद 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 31 May 2020

गेल्या 50 दिवसांपासून महापालिका गरीब व गरजू नागरिकांना मोफत जेवणाचे पॅकेट पुरवित आहे. मात्र आता लॉकडाउनमध्ये शिथिलता आणण्यात आली आहे तसेच परराज्यातील मजूरही स्वगृही गेल्याने महापालिकेने कम्युनिटी किचन उपक्रम बंद केले आहे. या कम्युनिटी किचन उपक्रमाचा आज समारोप झाला. 

नगर : देशात लॉकडाउन जाहीर झाल्याने अनेकांचे रोजगार बंद झाले. नागरिकांचा उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाला. अशा परिस्थितीत नागरिकांना मदत व्हावी, या भावनेतून महापालिकेने कम्युनिटी किचनसारखा सामाजिक उपक्रम सुरू केला. गेल्या 50 दिवसांपासून महापालिका गरीब व गरजू नागरिकांना मोफत जेवणाचे पॅकेट पुरवित आहे. मात्र आता लॉकडाउनमध्ये शिथिलता आणण्यात आली आहे तसेच परराज्यातील मजूरही स्वगृही गेल्याने महापालिकेने कम्युनिटी किचन उपक्रम बंद केले आहे. या कम्युनिटी किचन उपक्रमाचा आज समारोप झाला. 

23 मार्चला देशात लॉकडाउन जाहीर केले. त्यानंतर अनेकांचे रोजगार बंद झाले. परराज्यातील मजूर राज्यात विविध ठिकाणी अडकले. परराज्यातील मजूर व गरीब गरजू नागरिकांची उपासमार होऊ लागली. हे पाहून नगर-कल्याण रस्त्यावरील जाधव लॉन व नगर-मनमाड रस्त्यावरील संजोग हॉटेल येथे लोकसहभागातून महापालिकेचे कम्युनिटी किचन सुरू केले.

महापालिकेच्या या उपक्रमासाठी महापालिकेच्या तिजोरीत पैसेच नसल्याने काही महापालिका कर्मचाऱ्यांनी पदरचे पैसे देऊन उपक्रम सुरू केला. जाधव लॉन व संजोग हॉटेलच्या संचालकांनी महापालिकेला या उपक्रमासाठी मोफत जागा उपलब्ध करून दिली. संजोग हॉटेलचे संचालक प्रदीप पंजाबी यांनी हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनाही या उपक्रमात मदत करायला लावली. या उपक्रमाची माहिती मिळताच काही दानशून मंडळींनी उपक्रमाला सढळ हाताने मदत केली. 

या उपक्रमात मदत करणाऱ्यांचा सत्कार करून उपक्रमाचा सांगता आज जाधव लॉनमध्ये करण्यात आली. यावेळी महापालिका आयुक्‍त श्रीकांत मायकलवार, आरोग्य अधिकारी नरसिंह पैठणकर, उद्यान विभाग प्रमुख शशिकांत नजन, गणेश लयचेट्टी आदी उपस्थित होते. संजोग हॉटेल येथेही सांगता कार्यक्रम झाला. यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे, यंत्र अभियंता परिमल निकम, पाणी पुरवठा विभाग प्रमुख महादेव काकडे, संजोग हॉटेलचे संचालक प्रदीप पंजाबी आदी उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Municipal Community Kitchen closed