नगर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान मिळणार नाही

अमित आवारी
Monday, 26 October 2020

हे अनुदान दोन टप्प्यांत देण्यात आले. दिवाळीत पाच हजार तर मार्चमध्ये दोन हजार रुपये देण्यात आले होते. गेल्या वर्षी प्रमाणे यंदाही कामगार संघटनेने 20 हजार रुपये सानुग्रह अनुदानाची मागणी केली आहे. 

नगर ः महापालिका कर्मचाऱ्यांना दिवाळीचे सानुग्रह अनुदान दिले जावे या मागणीसाठी महापालिका आयुक्‍तांनी आज नगर महापालिका कामगार संघटनेतील पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती.

या बैठकीत महापालिका प्रशासन गेल्या वर्षी एवढेही सानुग्रह अनुदान देण्यास तयार नसल्याचे सांगण्यात आले. कामगार संघटना मात्र प्रत्येक कर्मचाऱ्याला 20 हजार रुपये सानुग्रह अनुदानावर ठाम आहे. यावर आज कोणताही निर्णय न झाल्याने मंगळवारी (ता. 3 नोव्हेंबर) पुढील बैठक बोलावण्यात आली आहे. 

दिवाळी सानुग्रह अनुदानासंदर्भात आज झालेल्या बैठकीला महापालिका आयुक्‍त श्रीकांत मायकलवार, उपायुक्‍त डॉ. प्रदीप पठारे, अस्थापना विभाग प्रमुख मेहेर लहारे, कामगार अधिकारी दिगंबर कोंडा, मुख्य लेखाधिकारी प्रवीण मानकर, कामगार संघटनेचे अध्यक्ष अनंत लोखंडे, सरचिटणीस आनंदराव वायकर, उपाध्यक्ष अय्यूब शेख, राहुल साबळे, कार्याध्यक्ष गुलाब गाडे, सहसचिव अखिल सय्यद आदी उपस्थित होते. 

महापालिका कामगारांना त्यांच्या धर्मानुसार गोकुळाष्टमी, दिवाळी अथवा रमजान ईदला सानुग्रह अनुदान मिळते. दिवाळीला सानुग्रह अनुदान घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या जास्त आहे. गेल्या वर्षी दिवाळीत कर्मचाऱ्यांना सात हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात आले होते.

हे अनुदान दोन टप्प्यांत देण्यात आले. दिवाळीत पाच हजार तर मार्चमध्ये दोन हजार रुपये देण्यात आले होते. गेल्या वर्षी प्रमाणे यंदाही कामगार संघटनेने 20 हजार रुपये सानुग्रह अनुदानाची मागणी केली आहे. 

महापालिका आयुक्‍त मायकलवार यांनी लॉकडाउनमुळे थंडावलेली वसुली मोहीम व महापालिकेच्या आर्थिक स्थितीचे कारण पुढे केले. अनंत लोखंडे यांनी महापालिकेने आर्थिक स्थितीचे कारण न दाखविता कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करावी. त्यांना कोरोना काळात आधार द्यावा असे सांगितले. 

आमदारांना साकडे 
दिवाळी सानुग्रह अनुदान मिळावे या मागणीचे निवेदन आज महापालिकेच्या प्रभाग समिती दोन मधील कर्मचाऱ्यांनी आमदार संग्राम जगताप यांना दिले. तसेच या प्रश्‍नी लक्ष घालण्याचे साकडे आमदार जगताप यांना घातले. आमदार जगताप यांनी कर्मचाऱ्यांना आश्‍वासन दिले. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Municipal employees will not get sanugrah grant