मेंदू चालवून एमआरआय आणला पण भिजायला ठेवला

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 20 September 2020

नगरकरांना अल्प दरात "एमआरआय' सुविधा मिळावी, यासाठी महापालिकेने हे मशिन खरेदी केले. त्यासाठी नियोजन मंडळाचा साडेतीन कोटींचा निधी वापरला. सहा महिन्यांपूर्वी महासभेची मंजुरी घेतली.

नगर ः महापालिकेने तब्बल साडेतीन कोटी रुपये खर्चून आणलेले "एमआरआय' मशिन सावेडीतील सावित्रीबाई फुले भाजी मार्केटच्या आवारात दोन महिन्यांपासून पडून आहे. ते सध्या पावसात भिजत आहे.

कॉंग्रेसचे माजी नगरसेवक निखिल वारे व शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी स्वतंत्र प्रसिद्धिपत्रके काढून याबाबत नाराजी व्यक्‍त केली. 

नगरकरांना अल्प दरात "एमआरआय' सुविधा मिळावी, यासाठी महापालिकेने हे मशिन खरेदी केले. त्यासाठी नियोजन मंडळाचा साडेतीन कोटींचा निधी वापरला. सहा महिन्यांपूर्वी महासभेची मंजुरी घेतली. मात्र, सहा महिने उलटूनही हे मशिन कोठेच बसविलेले नाही. काही दिवसांपूर्वीच त्याचे साडेतीन कोटींचे बिल संबंधित पुरवठादार कंपनीला दिले.

गिरीश जाधव, वारे, शिवसेनेचे नगरसेवक बाळासाहेब बोराटे, काका शेळके यांनी नुकतीच मशिनची पाहणी केली. 
वारे म्हणाले, की मशिन वापरण्यासाठी महापालिकेकडे तांत्रिक कर्मचारी नाहीत. असे कर्मचारी नसताना महापालिकेने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निधीची मागणी केली. त्यास महापालिका आयुक्‍त व वैद्यकीय आरोग्य अधिकारीच जबाबदार आहेत. पावसात मशिन भिजत असल्याने महापालिकेने त्यावर ताडपत्री अंथरली. शासकीय पैशांचा हा अपव्यय आहे. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Municipal MRI machine is soaking in the rain