esakal | पैशासाठी पत्नीचा केला खून, संगमनेरची घटना
sakal

बोलून बातमी शोधा

Killed his wife for the lure of money

लग्नानंतर तीन-चार वर्षांनी पती सोमनाथने गाय घेण्यासाठी पैशांची मागणी केली. त्याला गाय पोचती केल्यानंतर दुचाकीसाठीही पैसै मिळाले.

पैशासाठी पत्नीचा केला खून, संगमनेरची घटना

sakal_logo
By
आनंद गायकवाड

संगमनेर ः आर्थिक परिस्थिती बिकट असतानाही लेकीच्या सुखासाठी आई-वडिलांनी जावयाची प्रत्येक मागणी पुरवली. त्यातून सोकावलेल्या जावयाने मग कारणे शोधत पैसे मागण्याचा सपाटाच लावला.

अखेर सासरच्या माणसांनी हात टेकले. संतप्त जावयाने त्याचा राग पत्नीवर काढला. टणक हत्याराने केलेल्या मारहाणीत जिव्हारी घाव बसल्याने पत्नीचा मृत्यू झाला. तालुक्‍याच्या पूर्व भागातील पानोडी येथे काल (शनिवारी) सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली. 

अनिता ऊर्फ ज्योती सोमनाथ दिघे (वय 33, रा. पानोडी, ता. संगमनेर) असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी आरोपी पती सोमनाथ शंकर दिघे (वय 40) याला अटक केली. याबाबत मृत अनिताचा भाऊ ज्ञानेश्वर जगन्नाथ मोहीम (रा. जामगाव, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) यांनी आश्वी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार 16 वर्षांपूर्वी बहिण अनिताचे पानोडी येथील सोमनाथ दिघे याच्यासोबत लग्न झाले.

लग्नानंतर तीन-चार वर्षांनी पती सोमनाथने गाय घेण्यासाठी पैशांची मागणी केली. त्याला गाय पोचती केल्यानंतर दुचाकीसाठीही पैसै मिळाले. त्यानंतर त्याच्या अपेक्षा वाढत गेल्या. दीड महिन्यापूर्वी उसनवार व कर्ज फेडण्यासाठी त्याने अनिताला माहेरून 50 हजार रुपये घेऊन येण्याची मागणी केली. मात्र, ही मागणी पूर्ण न झाल्याचा राग त्याच्या मनात होता. 

दरम्यान, विविध कारणांवरुन अनिताचा सासरी छळ सुरू झाला. काल (शनिवारी) सकाळी झालेल्या किरकोळ वादातून सोमनाथने टणक हत्याराने तिला मारहाण केली. त्यात ती गंभीर जखमी झाली. शेजाऱ्यांनी तिला लोणीच्या प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्‍टरांनी तिला मृत घोषित केले.

याबाबत रात्री उशिरा आश्वी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी आरोपी पती सोमनाथ यास अटक केली. आज दुपारी पानोडी येथे पोलिस बंदोबस्तात अनितावर अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी आरोपीस 6 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.