काॅंग्रेस कार्यकर्त्यांची टीम उतरणार कोरोना निर्मूलनासाठी

अशोक निंबाळकर
Friday, 18 September 2020

अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेसच्यावतीने ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या अभियानाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे

नगर : अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेसच्यावतीने ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या अभियानाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि शुभहस्ते या अभियानाचा शुभारंभ उद्या (दि.१९) होणार असल्याची माहिती, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी दिली आहे.

उद्या शनिवार (ता. १९ सप्टेंबर) रोजी सायंकाळी सव्वा पाच वाजता माऊली सांस्कृतिक भवन, टिळक रोड या ठिकाणी हा कार्यक्रम प्रशासनाच्या सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करून पार पडणार आहे. यावेळी आ.डॉ.सुधीर तांबे, आ.लहू कानडे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके, जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे, ज्येष्ठ नेते दीप चव्हाण आदींची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

महाराष्ट्र शासनाने हे अभियान सुरू केले आहे. या अभियानामध्ये अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस देखील आता उतरले असून प्रशासनाच्या मदतीला धावून जात नगर शहरामध्ये हे अभियान काँग्रेस पक्ष राबविणार आहे. 

या अभियानाच्या संकल्पनेविषयी माहिती देताना शहर जिल्हाध्यक्ष काळे म्हणाले की, ना. बाळासाहेब थोरात यांच्या सूचनेनुसार आम्ही हा कार्यक्रम नगर शहरामध्ये हाती घेतला आहे. आ.डॉ.सुधीर तांबे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजितदादा तांबे यांच्या नेतृत्वाखाली नगर शहरामध्ये आम्ही अभियान राबवणार  आहोत.

या अभियानाच्या माध्यमातून शहर जिल्हा काँग्रेसचे शंभर कार्यकर्ते हे 'कोरोनादूत' म्हणून या अभियानामध्ये पूर्णवेळ काम करणार आहेत. एक महिना चालणाऱ्या या अभियानामध्ये पुढील चार आठवड्यातील प्रत्येकी तीन दिवस काँग्रेसचे कोरोनादूत हे शहरातील १७ प्रभागांमध्ये प्रत्यक्ष जाऊन गृहभेटी भेटी देत जनजागृती करणार आहेत.

जनजागृतीच्या माध्यमातून लोकांना समाजात वावरत असताना पूर्णवेळ मास्क वापरणे, सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे, सॅनिटायझरचा वापर करणे याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे.  

काँग्रेस पक्षाची डॉक्टरांची टीम या वेळी लोकांना मास्कचा शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि परिणामकारकरीत्या कशा पद्धतीने वापर करावा, याबद्दलचे प्रात्यक्षिक देखील करून दाखवणार आहेत. मास्क योग्य प्रकारे न वापरल्यामुळे मास्क वापरून सुद्धा कोरोना झाला असल्याच्या अनेक घटना आपल्या समोर येत आहेत. त्यामुळे नागरिकांना याबाबत तंत्रशुद्ध पद्धतीने प्रशिक्षित करण्याचे काम काँग्रेसची टीम या अभियानामध्ये करणार असल्याचे काळे यांनी सांगितले आहे.

गृह भेटींच्या वेळी कोरोना संदर्भामध्ये नागरिकांना हॉस्पिटलमध्ये बेड मिळणे, ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर बेड मिळणे यासारखी लागणारी अत्यावश्यक मदत तातडीने मिळावी, यासाठी महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात यांनी शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांचा काँग्रेस पक्षाची हेल्पलाईन म्हणून जाहीर केलेला वैयक्तिक मोबाईल क्रमांक शहरातील नागरिकांना उपलब्ध करून दिला जाणार आहे. 

काळे म्हणाले की, नगर शहराच्या सर्व प्रभागांमध्ये काँग्रेसचे कोरोनादूत हे अभियान राबवत कोरोनाचे नगर शहरातून शतप्रतिशत उच्चाटन करण्याचे ध्येय समोर ठेवून काम करणार आहेत. या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी काँग्रेस पक्षाच्या सर्व फ्रंटलचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचा सक्रिय सहभाग असणार आहे. 

नगर शहरातील आरोग्य विषयी काम करणाऱ्या संस्था, संघटना तसेच नागरिकांनी देखील काँग्रेस पक्षाच्या या अभियानामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष काळे यांनी नगरकरांना केले आहे.

•    अभियान १ महिना चालणार 
•    कॉंग्रेसचे १०० कार्यकर्ते कोरोना दूत म्हणून काम करणार 
•    सर्व १७ प्रभागांमध्ये अभियानाची अंमलबजावणी करणार
•    मास्क शास्रशुद्घ पद्धतीने कसा वापरावा याचे प्रशिक्षण देणार 
•    मोठ्या प्रमाणावर जनजागृती करणार 
•    किरण काळेंचा वैयक्तिक मोबाईल क्रमांक कोरोना हेल्पलाईन म्हणून नागरिकांपर्यंत पोहोचविणार 
•    कोरोनाच्या शतप्रतिशत उच्चाटनाचे उद्दिष्ट

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: My Family My Responsibility campaign will be implemented on behalf of Ahmednagar City District Congress