नगर जिल्ह्यातील गावांना मिळणार पंचतत्त्वाचे बळ; ‘माझी वसुंधरा’त 19 गावांची निवड

दौलत झावरे
Sunday, 8 November 2020

जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील पर्यावरणाच्या संतुलनासाठी पंचतत्त्वाचा अवलंब करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी राज्य सरकारने "माझी वसुंधरा' हे खास अभियान सुरू केले आहे.

अहमदनगर : जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील पर्यावरणाच्या संतुलनासाठी पंचतत्त्वाचा अवलंब करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी राज्य सरकारने "माझी वसुंधरा' हे खास अभियान सुरू केले आहे. जिल्ह्यातील एकूण 19 गावांची त्यासाठी निवड झाली आहे. या गावांमध्ये 2020-21मध्ये पृथ्वी, वायू, जल, अग्नी व आकाश या पंचतत्त्वानुसार विकासकामे केली जाणार आहेत.

नगर महापालिकेसह 10 नगरपालिका, पाच नगरपंचायती व 19 गावांचा त्यात समावेश आहे. ही सर्व गावे 10 हजार लोकसंख्येच्या पुढील आहेत. आणखी 10 हजार लोकसंख्येच्या 12 गावांचा अभियानात समावेश व्हावा, यासाठी जिल्हा परिषदेचे प्रयत्न सुरू आहेत. अभियानात निवडलेल्या शहरांना "अमृत शहरे' नाव दिले आहे.
पंचतत्त्वानुसार विकासकामे होणार असून, प्रत्येक गटात तीन विजेते निवडण्यात येणार आहेत.

सर्वोत्तम विभागीय आयुक्त, सर्वोत्तम जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची निवड केली जाणार आहे. एक एप्रिल ते 31 मे 2021दरम्यान त्रयस्थ यंत्रणेमार्फत त्याचे मूल्यांकन होणार आहे. त्यानंतर त्याचा निकाल जाहीर होऊन पाच जूनला बक्षीस वितरण होईल.

अभियानातील गावे, शहरे
नगर महापालिका. नगरपालिका :
श्रीरामपूर, संगमनेर, कोपरगाव, राहुरी, राहाता, श्रीगोंदे, पाथर्डी, देवळाली प्रवरा, शेवगाव, जामखेड. नगरपंचायती : कर्जत, नेवासे, अकोले, पारनेर, शिर्डी. गावे : साकुरी, निघोज, घोडेगाव, कोकमठाण, चांदे, संवत्सर, बेलवंडी बुद्रुक, वाकडी, मिरजगाव, सुरेगाव, लोणी बुद्रुक, राशीन, पुणतांबे, कोल्हार बुद्रुक, निपाणी वडगाव, काष्टी, सोनई, वांबोरी, लोणी खुर्द.

पंचतत्त्वानुसार कामांची वर्गवारी
पृथ्वी :
वनीकरण, वनसंवर्धन, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन व जमिनीची धूप आदी कामे.
वायू : वायुप्रदूषण कमी करून हवेच्या गुणवत्तेत सुधारणा केली जाणार आहे.
जल : नदीसंवर्धन, जैवविविधता जतन करणे, जलस्त्रोतांचे संरक्षण व संवर्धन,

नदीकिनाऱ्यांची स्वच्छता.
अग्नी :
ऊर्जेचा परिणामकारक वापर, ऊर्जेचा अपव्यय टाळणे, महामार्गांच्या बाजूच्या पडीक जागा, शेतीच्या बांधांवर पारंपरिक ऊर्जेबाबतचे उपक्रम राबविले जाणार आहेत.
आकाश : स्थळ व प्रकाश या स्वरूपात मानवी स्वभावातील बदलांसाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

पंचतत्त्वनिहाय गुण
पृथ्वी : 600, वायू : 100, जल : 400, आकाश : 300
एकूण : 1500. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: My selection of 19 villages in Nagar district in Vasundhara Abhiyan