शू्.... कुणी तरी आहे! कोपरगावकरांची झोप उडाली

mysterious voice An atmosphere of fear at Kopargaonkar
mysterious voice An atmosphere of fear at Kopargaonkar
Updated on

कोपरगाव : मध्यरात्रीची वेळ.. सर्वत्र भयाण शांतता पसरलेली. या शांततेला चिरत एक गुढ आवाज शहरभर पसरला. त्यानंतर तो एकसारखा येत राहिला. काही तरी अघटीत घडत असल्याची जाणीव प्रत्येकाला झाली; पण विचारणार कोणाला? तासभर हा गुढ आवाज येत राहिला.

काहीशा धास्तावलेल्या अवस्थेत या रहस्यमय आवाजासोबत सगळ्यांनी रात्र जागूनच काढली. अखेर पहाटे साडे तीनच्या सुमारास हा आवाज एकदाचा बंद झाला. पुन्हा एकदा शहरभर भीषण शांतता पसरली. त्यानंतर काहींना डोळा लागला. सकाळी उठल्यावर प्रत्येक जण तो गुढ आवाज कशाचा होता, याबाबत एकमेकांना विचारत होता.

प्रत्येकाच्या मनात विचारांचे काहूर उठले होते. एक अनामिक भीती पसरली होती.. अखेर त्याचा उलगडा झाला.. नि सर्वांचा जीव भांड्यात पडला.! 
मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास शहरात वेगळ्याच पद्धतीचा एकसुरात आवाज येत होता; पण नेमके काय घडले असावे, हे समजत नव्हते. मध्यरात्रीची वेळ असल्याने त्याचा तपास लागणेही शक्‍य नव्हते. काहींनी सोशल मीडियावर मेसेज टाकले, काहींनी प्रश्न केले; मात्र कोणालाच थांगपत्ता लागला नाही. 15 ते 20 मिनिटांनी आवाज कमी झाला नि पुन्हा एकदम वाढला. नगर-मनमाड महामार्गावरच काही तरी फुटले असावे, असा अंदाज अनेकांनी व्यक्त केला. प्रत्येकाची रात्र या आवाजाबाबत विचार करण्यातच सरली. एकदाची सकाळ झाली नि प्रत्येक जण या आवाजाबाबत विचारणा करू लागला. 

दरम्यान, नगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे प्रमुख संभाजी कार्ले यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, की रात्री वेगळा आवाज ऐकल्यावर कोल्हे साखर कारखान्याचे आपत्ती व्यवस्थापक प्रकाश डुंबरे यांना मोबाईवर काही दुर्घटना घडली आहे का, आवाज कसला येत आहे, अशी विचारणा केली. त्यावर त्यांनी सांगितले, की साखर कारखान्यात जास्तीची वाफ तयार होते. त्यामुळे सुरक्षेसाठी असलेला व्हॉल्व आपोआप उघडतो. त्यातून जास्तीची वाफ बाहेर पडताना हा आवाज होतो.

या घटनेत कुठलीही जीवित वा वित्तहानी झाली नसून, कारखान्याची ही सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. दरम्यान, कार्ले यांनी सोशल मीडियावर याबाबत खुलासा केल्यावर सर्वांचा जीव भांड्यात पडला. 

कोल्हे साखर कारखान्यात जास्तीची वाफ तयार झाल्यावर ती आपोआप बाहेर सोडली जाते. ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असून, दिवसासुद्धा अशा प्रकारे वाफ बाहेर पडते. मात्र, रात्रीच्या वेळी शांतता असल्याने त्याचा आवाज सर्वत्र ऐकू आला. 
- प्रकाश डुंबरे, आपत्ती व्यवस्थापन प्रमुख, शंकरराव कोल्हे कारखाना, कोपरगाव  अहमदनगर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com