नगर जिल्ह्यात बांधकाम विभागाला लागेना रस्ता दुरुस्ती खर्चाचा मेळ 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 15 November 2020

जिल्ह्यात दोन महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्हा परिषदेच्या रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली.

अहमदनगर : जिल्ह्यात दोन महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्हा परिषदेच्या रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली. जिल्ह्यातील 1441 किलोमीटर रस्त्याची दुरुस्ती अपेक्षित असून, त्यासाठी सुमारे 140 कोटींच्या निधीची गरज आहे.

तसा प्रस्ताव विभागीय कार्यालयाकडे पाठविला; मात्र रस्तादुरुस्तीसाठी अवास्तव मागणी केल्याचे सांगून पुन्हा अहवाल सादर करण्याची सूचना जिल्हा परिषदेला केली आहे. विभागीय कार्यालयाच्या सूचनेनुसार बांधकाम विभाग खर्चाची आकडेमोड करीत असून, त्याचा मेळ अद्याप घालता आलेला नाही. 

जिल्ह्यात मागील दोन महिन्यांत अतिवृष्टी झाली. त्यामुळे जिल्ह्यातील पिकांसह रस्ते, पुलांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जिल्हा परिषदेंतर्गत असलेल्या रस्त्यांना मोठा फटका बसला. सुमारे 1441 किलोमीटर रस्त्यांची दुरवस्था झाली. त्यात काही पुलांचाही समावेश आहे. काही रस्त्यांची दुरुस्ती, तर काही रस्ते पुन्हा तयार करावे लागणार आहेत. काही पूल पुन्हा उभारावे लागतील. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने सर्व रस्त्यांची पाहणी करून, 1441 किलोमीटर रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी सुमारे 140 कोटींचा खर्च गृहीत धरला. तसा अहवाल विभागीय कार्यालयाला सादर केला.

विभागीय कार्यालयाकडून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र पाठवून जास्त निधीची मागणी केलेली असल्याने, प्रस्ताव पुन्हा पाठविण्याचे सूचित केलेले आहे. त्याला पंधरा दिवसांचा कालावधी लोटला तरी पुन्हा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडून विभागीय आयुक्तांकडे दाखल झालेला नाही. कामांसाठी लागणारा खर्च व विभागीय कार्यालयाकडून आलेल्या सूचनांनुसार खर्चाचा मेळ बसविण्यात बांधकाम विभागाकडून आकडेमोड सुरू आहे. यामुळे जनतेला मात्र खराब रस्त्यांचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. 

रस्त्यांची दुरुस्ती करा 
ग्रामीण भागातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. त्यामुळे ग्रामीण रस्त्यांवर किरकोळ स्वरूपाचे अपघात होत असून, रस्त्यांची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. 

संपादन : अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nagar district the cost of road repair is not covered by the construction department