गरिबाच्या स्वप्नातील घरकुल केवळ ‘यामुळे’ रखडले

प्रवीण पाटील
Tuesday, 11 August 2020

बोधेगाव परिसरातील बहुतेक घर बांधकामे वाळू अभावी बंद आहेत. बहुतेकांनी गृह कर्ज घेऊन बांधकामे सुरु केली होती.

बोधेगाव (अहमदनगर) : बोधेगाव परिसरातील बहुतेक घर बांधकामे वाळू अभावी बंद आहेत. बहुतेकांनी गृह कर्ज घेऊन बांधकामे सुरु केली होती. परंतु वाळूअभावी कामे बंद जरी असली तरी कर्जावरील व्याज मात्र सुरु आहे. सरकारच्या गरिबांसाठी असलेल्या घरकुल योजनेतील लाभार्थ्यांनाही त्याचा मोठा फटका बसत आहे.

रमाई आवास योजना व प्रधानमंत्री आवास योजना याद्वारे बोधेगाव मध्ये अंदाजे 116 घरकुल मंजूर असून बहुतेक कामे वाळू अभावी अर्धवट अवस्थेत पडून आहेत.
एका घरकुलासाठी शासनाकडून एक लाख वीस हजार व महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत 18 हजार रुपये असे एकून एक लाख 38 हजार रुपये मिळत आहेत. 

आज गावात तापी नदीतून एक दुसरी वाळूची गाडी येते पण वाहतूक लांब असल्यामुळे सात हजार रुपये ब्रास घ्यावी लागत आहे . शासनाच्या घरकुल धारकाला ही वाळू घेऊन बांधकाम करायचे असल्यास एक लाखाची वाळूच लागेल, मग उरलेल्या 38 हजारात काय होणार... त्यातही ही घरकुलाची रक्कम टप्या टप्याने मिळते. त्यामुळे ही कामे बंद आहेत. एकीकडे वाळू भेटत नाही, आणी दुसरीकडे इतर बांधकाम साहित्याचे दरही महाग झाले आहे. त्यामुळे शासनाने दिलेल्या रक्कमेत बांधकाम कसे पूर्ण करायचे हा प्रश्न घरकुल लाभार्थी पुढे निर्माण झाला आहे.

काहींनी दगडापासून बनवलेली ' क्रश सँड ' वापरून बांधकाम करण्याचा प्रयत्न केला परंतु त्याचाही तुटवडा निर्माण झाला. तरी सरकारने या सगळ्या गोष्टींचा विचार करून नदी पात्रातील वाळू साठ्यांचे लिलाव तातडीने करून गोरगरीब व मध्यमवर्गीय जनतेला दिलासा द्यावा जेणे करून शासनाच्या तिजोरीत पण हक्काचा महसूल मोठ्या प्रमाणात वर्ग होईल. व गोरगरीब व मध्यम वर्गीय जनतेला हक्काच्या घरात राहण्याचे स्वप्न पूर्ण होईल. 

लॉकडाऊनमुळे आधीच जेरीस आलेला मजूर, वाळू अभावी बंद पडलेल्या बांधकामामुळे आणखीच अडचणीत सापडला आहे.
- गोकुळ घोरतळे, बांधकाम व्यवसायिक 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In the Nagar district the dream houses of the poor are stalled due to lack of sand