नगर जिल्ह्यात एका प्रशासकडे दोनपेक्षा अधिक ग्रामपंचायतीचा कारभार; ग्रामस्थांत नाराजीचा सूर 

सुनिल गर्जे
Monday, 9 November 2020

जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात मुदत संपलेल्या नेवासे तालुक्‍यातील 59 ग्रामपंचायींमध्ये सध्या प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

नेवासे (अहमदनगर) : जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात मुदत संपलेल्या नेवासे तालुक्‍यातील 59 ग्रामपंचायींमध्ये सध्या प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये एका-एका प्रशासकावर दोन पेक्षा अधिक गावांचा पदभार सोपविण्यात आला आहे. त्यातच कोरोनामुळे वाढलेल्या कामाच्या व्यापामुळे प्रशासकांनी ग्रामपंचायतीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे ग्रामपंचायतींच्या विकासाला 'ब्रेक' लागला. 

जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर 2020 या कालावधीत ग्रामपंचायतींची मुदत संपली. ग्रामपंचायतीवर जिल्हा परिषदेने प्रशासकाची नियुक्ती केली. यामध्ये पंचायत समितीच्या विस्ताराधिकाऱ्यासह विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली. यापैकी काही अधिकाऱ्यांकडे एक तर काहींवर दोनपेक्षा अधिक ग्रामपंचायतींचा कारभार सोपविण्यात आला आहे. मात्र अधिकारी ग्रामपंचायतीकडे फिरकलेच नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

सध्या कोरोनामुळे शासकीय स्तरावरील कामाचा व्याप वाढला आहे. त्यामुळे अधिकारी ग्रामपंचायतीकडे फिरकत नसल्याचे समजते. मागील महिन्यात परतीच्या पावसाने चांगलाच धुमाकूळ सुरु केला आहे. गावातील रस्ते, नाल्यांची दुरवस्थ झाली आहे. त्यातच गावातील दिवाबत्तीवरही परिणाम झाला आहे. त्यामुळे दुरुस्तीकडे लक्ष द्यायला अधिकाऱ्यांना सध्या तरी वेळ नाही. 

ग्रामसेवकांची दमछाक..! 
मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्यात आले आहे. मात्र, त्यांच्यावर असलेल्या कामाच्या ताणामुळे ते गावाकडे फिरकत नसल्याने ग्रामसेवकांची जबाबदारी वाटली आहे. बहुतांश प्रशासक पंचायत समितीचे अधिकारी असल्याने ग्रामसेवक पंचायत समितीत जाऊन त्यांची स्वाक्षरी घेत आहेत. 

ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, प्रशासकांना त्यांच्याच खात्यातील कामांतून वेळ मिळत नसल्याने ग्रामपंचायतींना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाने संबंधित प्रशासकांना नियुक्त ग्रामपंचायतीत आठवड्यातून दोन दिवस उपस्थित राहण्याचे सक्ती करावी. 
- दौलत देशमुख, माजी सरपंच, कुकाणे, ता. नेवासे 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Nagar district one person has more than two Gram Panchayats