नगर-कोपरगाव राष्ट्रीय महामार्ग, ४०० कोटी रूपयांचा निधी मंजूर, विखे पाटलांची माहिती

सकाळ वृत्तसेवा
Monday, 26 October 2020

जेथे गरज आहे तेथे काॅक्रीटीकरण व अन्य ठिकाणी डांबरीकरण अशा पध्दतीने हा राष्ट्रीय महामार्ग तयार केला जाईल. येत्या चार ते पाच महिन्यात या कामास प्रारंभ होईल.

शिर्डी ः खड्ड्यात हरविलेल्या नगर ते कोपरगाव या राज्यमार्गास राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला. त्यातील सावळिविहीर ते नगरपर्यंतच्या अंतरातील कामासाठी केंद्रीय रस्ते वहातुक मंत्री नितीन गडकरी यांनी साडे चारशे कोटी रूपयांचा निधी मंजुर केला.

जेथे गरज आहे तेथे काॅक्रीटीकरण व अन्य ठिकाणी डांबरीकरण अशा पध्दतीने हा राष्ट्रीय महामार्ग तयार केला जाईल. येत्या चार ते पाच महिन्यात या कामास प्रारंभ होईल. अशी माहीती खासदार डाॅ.सुजय विखे पाटील यांनी गणेश कारखाना गाळप हंगामाच्या प्रारंभी पत्रकारांशी बोलताना दिली. 

ते म्हणाले, हा रस्ता अनेक ठिकाणी उध्वस्त झाला. त्याच्या दुर्दशेचे फोटो व व्हीडीओ संकलीत करून आपण ते केंद्रीय मंत्री गडकरी यांना दाखविले. साईबाबांची शिर्डी व शनी शिंगणापूर या दोन महत्वाच्या देवस्थानांना जोडणारा हा रस्ता आहे. हे त्यांच्या निदर्शनास आणून दिले.

आपल्या वर्षभराच्या पाठपूराव्याला यश आले. केंद्रीय मंत्री गडकरी यांनी याबाबतच्या कागदोपत्री पुर्तता करण्याच्या सुचना सबंधित अधिका-यांना दिल्या होत्या. या पूर्ततेनंतर त्यांनी पुढाकार घेऊन, राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी सल्लागार कंपनीची नियुक्ती केली. या कंपनीने कामाचा आराखडा देखील तयार केला. 160 क्रमांकाचा हा राष्ट्रीय महामार्ग सिन्नर-सावळिविहीरफाटा ते अहमदनगर असा आहे. 

सावळिविहीर ते कोपरगाव या अंतराला देखील राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला. वेगळ्या क्रमांकाने त्याचे देखील काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. सावळिविहीर ते राहाता न्यायालय पर्यतचा मार्ग काॅक्रीटचा केला जाईल. हा रस्ता अर्थातच चौपदरी असेल. दोन्ही बाजुला पाणी निघून जाण्यासाठी गटारे असतील. बाह्यवळण रस्त्याचे काम व देखभाल सार्वजनिक बांधकाम विभाग करेल. आणि सावळिवीहीर ते राहात्या पर्यत काॅक्रीटचा रस्ता होईल. तिसगाव फाटा ते कोल्हार या अंतरातील रस्ता देखील काॅक्रीटचा होईल. 

 

आपण गेल्या वर्षभरापासून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे या कामाचा पाठपुरावा करीत होतो. आता राष्ट्रीय महामार्गाच्या दर्जाचे काम होणार असल्याने यावरून प्रवास करणा-यांची सध्याच्या त्रासातून मुक्तता होईल. काही ठिकाणी रस्ता पूर्णपणे खोदून तो पाया मजबूत करून पून्हा बांधणे, आवश्यक तेथे काॅक्रीटचा रस्ता तयार करणे व जेथे चांगला रस्ता आहे तेथे मजबुतीसाठी त्यावर डांबरीकरणाचा थर देणे. अशा पध्दतीने हे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. 

- डॉ. सुजय विखे पाटील, खासदार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nagar-Kopargaon National Highway, a fund of Rs. 400 crore has been sanctioned