नगर-पुणे महामार्ग नववर्षात राहणार बंद

अमित आवारी
Friday, 25 December 2020

कोरेगाव भीमा येथील कार्यक्रमाच्या पार्श्‍वभूमीवर 31 डिसेंबरला सायंकाळी पाच ते एक जानेवारी 2021 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत नगर-पुणे महामार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.

नगर ः पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथे एक जानेवारीला विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम होतो. त्यामुळे पुण्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी नगर-पुणे महामार्गावरील वाहतूक एक जानेवारीला बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 

कोरेगाव भीमा येथे एक जानेवारीला विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमास राज्यभरातून लोक येतात. यंदा कार्यक्रमावर कोरोनाचे सावट असल्याने, सरकारने सर्व सण-उत्सव साध्या पद्धतीने साजरे करण्याचे आवाहन केले आहे.

एक जानेवारीला विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या अनुषंगाने पुणे-नगर महामार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक इतर मार्गाने वळविली आहे. 

कोरेगाव भीमा येथील कार्यक्रमाच्या पार्श्‍वभूमीवर 31 डिसेंबरला सायंकाळी पाच ते एक जानेवारी 2021 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत नगर-पुणे महामार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. चाकण ते शिक्रापूर वाहतूक बंद करण्यात येणार आहे.

शिवाय नगरहून पुणे, मुंबईकडे जाणारी जड वाहने शिरूर, न्हावरा, पारगाव, चौफुला, यवत, हडपसर या पर्यायी मार्गाने पुण्याकडे जातील. पुण्याहून नगरकडे येणारी जड वाहने ही खराडी बायपास येथून हडपसर, पुणे-सोलापूर महामार्गावरून चौफुला, न्हावरा, शिरूर अशी वळविली आहे.

सोलापूर रस्त्याने आळंदी, चाकण या भागात जाणारी जड वाहने हडपसर, मगरपट्टा, खराडी बाह्यवळण रस्त्यामार्गे विश्रांतवाडी येथून आळंदी व चाकण येथे जातील. मुंबईहून नगरकडे येणारी जड वाहने चाकण, मंचर, आळेफाटामार्गे येतील. हलकी वाहने चाकण, खेड, शिरूरमार्गे येतील, असा आदेश पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nagar-Pune highway will be closed in New Year