नेवासे पंचायत समितीला यशवंतराव गडाखांचे नाव

सुनील गर्जे
Friday, 30 October 2020

पंचायत समितीच्या प्रवेशद्वारावर शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता माजी सभापती कारभारी जावळे, सभापती रावसाहेब कांगुणे, उपसभापती किशोर जोजार, माजी सभापती कल्पना पंडित यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून नामकरणाचा शुभारंभ करण्यात आला.

नेवासे : नेवासे तालुक्यातील वैभवात भर घालणाऱ्या नेवासे पंचायत समितीच्या सुसज्ज इमारतीला 'जेष्ठ साहित्यिक मा. खासदार यशवंतरावजी गडाख भवन' असे नामकरण करण्याचा  ऐतिहासिक निर्णय  सर्वानूमते ठरावाद्वारे घेत शुक्रवार (ता. ३०) रोजी पंचायत समितीचे  आजी-माजी पदाधिकारी व सदस्यांच्या उपस्थित नामकरणाचा शुभारंभ करण्यात आला.     

जेष्ठ साहित्यिक व नेते यशवंतराव गडाख यांनी नेवासे तालुक्यासह जिल्ह्यात प्रभावीपणे विकासात्मक कामे केली त्यांचे ते काम कायम आदर्शवत आहे. त्यांचे स्थानिक स्वराज संस्थेत कामाच्या माध्यमातून असलेले योगदान लक्षात घेऊन माजी सभापती व ज्येष्ठ नेते कारभारी जावळे यांच्या संकल्पना मांडली .

गुरुवार (ता. २९) रोजी जावळे यांच्याच अध्यक्षतेखाली  पंचायत समितीत झालेल्या मासिक बैठकीत  नामकरण करण्याची सूचना पंचायत समितीच्या सदस्या मीनाक्षी सोनवणे यांनी मांडली त्यास  सविता झगरे यांनी अनुमोदन  दिले. यावेळी उपस्थित सर्व सदस्यांनी यास एकमुखी पाठिंबा देत पंचायत समिती इमारतीस 'जेष्ठ साहित्यिक मा. खासदार यशवंतरावजी गडाख भवन' असे नामकरण
ठराव मंजूर करण्यात आला. 

पंचायत समितीच्या प्रवेशद्वारावर शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता  माजी सभापती कारभारी जावळे, सभापती रावसाहेब कांगुणे, उपसभापती किशोर जोजार, माजी सभापती कल्पना पंडित यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून नामकरणाचा शुभारंभ करण्यात आला. 

यावेळी पंचायत समितीचे जेष्ठ सदस्या पार्वती जावळे, वैशाली एडके, राजनंदिनी मंडलिक, सविता झगरे, मीनाक्षी सोनवणे,  विक्रम चौधरी, दादासाहेब एडके, कैलास झगरे,  आशुतोष नवले उपस्थित होते.  

"मंत्री  शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासे पंचायत समिती आदर्श काम करत असून जेष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी या आधी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून केलेले आदर्श काम भावी पिढीला कळावे म्हणून नामकरण करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.
- ज्येष्ठ नेते  कारभारी जावळे, माजी सभापती 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Name of Yashwantrao Gadakh to Newase Panchayat Samiti