
2015-16 मध्ये नगर परिषदेची पहिली पंचवार्षिक निवडणूक प्रभाग 14मधून मनसेच्या अधिकृत तिकिटावर लढविली
शेवगाव : नगर परिषदेची मागील पंचवार्षिक निवडणूक मनसेच्या तिकिटावर लढविलेल्या, मनसे विद्यार्थी सेनेच्या तालुकाध्यक्षांचेच नाव नगरपालिकेच्या मतदार यादीतून गायब झाल्याने यादीतील गोंधळाचा अजब नमुना पाहावयास मिळाला.
प्रभाग 14मधून मागील निवडणूक लढविलेल्या अमोल पालवे यांच्यासह कुटुंबातील चार जणांची नावे नगर परिषदेच्या प्रारूप मतदार यादीतून गायब झाल्यामुळे त्यांचा मतदानाचा हक्कच डावलला. ही नावे पुन्हा अंतिम यादीत समाविष्ट करावीत, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा अमोल पालवे यांनी दिला आहे.
हेही वाचा - मोबाईलसाठी विद्यार्थ्याने केली आत्महत्या
तहसीलदार अर्चना भाकड- पागिरे यांना याबाबत निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे, की शहरातील खंडोबानगर भागात कुटुंबासह वास्तव्यास आहे. 2015-16 मध्ये नगर परिषदेची पहिली पंचवार्षिक निवडणूक प्रभाग 14मधून मनसेच्या अधिकृत तिकिटावर लढविली. त्यामुळे अडचणीत आलेल्या काही राजकीय मंडळींच्या सल्ल्यानुसार नगर परिषदेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सर्व प्रारूप मतदार यादीतून माझ्यासह वडील महादेव, आई मंगल व बहीण शीतल यांची नावे गायब केली.
या बाबत मुदतीच्या वेळेत हरकत घेतली आहे. नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी येणाऱ्या अंतिम यादीत आमची नावे समाविष्ट न झाल्यास कुटुंबीयांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसण्याचा इशारा पालवे यांनी दिला आहे.